Saree Cancer: साडी नेसल्याने खरंच कॅन्सर होतो? पाहा तज्ज्ञ काय सांगतात...

पुढारी वृत्तसेवा

भारतीय संस्कृती आणि परंपरेचा अविभाज्य भाग असलेली साडी सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.

'साडी कॅन्सर' या शब्दामुळे महिलांमध्ये भीती पसरली आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते साडी नेसणे धोकादायक नसून, ती चुकीच्या पद्धतीने किंवा अतिशय घट्ट नेसण्याची सवय आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

कमरेच्या एकाच भागावर सतत पडणारा दाब आणि घर्षण यामुळे त्वचेच्या कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

'साडी कॅन्सर' म्हणजे काय?

वैद्यकीय परिभाषेत 'साडी कॅन्सर' असे कोणतेही अधिकृत नाव नाही. डॉक्टर याला 'क्युटेनियस स्क्वॅमस सेल कार्सिनोमा' या त्वचेच्या कर्करोगाचा एक प्रकार मानतात.

हा आजार प्रामुख्याने कमरेच्या त्या भागावर होतो, जिथे साडी अनेक वर्षांपासून सतत एकाच जागी अतिशय घट्ट बांधली जाते.

तज्ज्ञांच्या मते, अनेक महिला वर्षानुवर्षे कमरेला एकाच ठिकाणी नाडी घट्ट बांधतात. यामुळे त्या भागातील त्वचेवर सतत दाब पडतो. कालांतराने तिथे दीर्घकाळ सूज राहते किंवा जखम होते, ज्याचे रूपांतर पुढे गंभीर आजारात होऊ शकते.

प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांच्या मते, हा आजार अचानक उद्भवत नाही. याची सुरुवात अतिशय सामान्य लक्षणांनी होते.

लक्षणे

  • संबंधित जागेवर सतत खाज येणे.

  • कमरेची त्वचा काळी पडणे.

  • त्वचा जाड किंवा खरखरीत होणे.

  • एखादी साधी जखम बराच काळ न भरणे.

अनेकदा महिला या प्राथमिक लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. जेव्हा ही जखम बरी होत नाही किंवा असह्य वेदना सुरू होतात, तेव्हाच डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. ही दिरंगाई घातक ठरू शकते.

प्रतिबंधात्मक उपाय

  • साडी कमरेला खूप जास्त आवळून बांधणे टाळा.

  • दररोज एकाच ठिकाणी गाठ न मारता, तिची जागा थोडी बदलत राहा.

  • कमरेच्या भागाची स्वच्छता राखा आणि घाम साचणार नाही याची काळजी घ्या.

  • शक्य असल्यास ब्रॉड पट्ट्याचा परकर वापरावा, जेणेकरून दाब विभागला जाईल.

  • जर या आजाराचे निदान वेळीच झाले, तर इतर त्वचेच्या कर्करोगाप्रमाणे यावरही प्रभावी उपचार उपलब्ध आहेत.

सूचना: ही प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळल्यास किंवा अधिक माहितीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.