Samosa: ५०० वर्षांपूर्वीच्या समोशाची रेसिपी व्हायरल; बटाटा नव्हे, तर राजघराण्यात 'हे' खास सारण वापरत

पुढारी वृत्तसेवा

कुरकुरीत समोसा आणि त्यातील बटाट्याचे मसालेदार सारण सर्वांना आवडतं. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, ५०० वर्षांपूर्वीचा समोसा आजच्यासारखा अजिबात नव्हता.

इतिहासाचे अभ्यासक डॉ. एम.एफ. खान यांनी सोशल मीडियावर समोशाची एक जुनी रेसिपी शेअर केली असून, ती सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

१५ व्या शतकातील राजघराण्यांमध्ये आवडीने खाल्ला जाणारा हा समोसा बटाट्याचा नसून मांसाहारी आणि सुगंधी द्रव्यांनी युक्त होता.

डॉ. खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५०१ ते १५१० या काळात मांडूच्या सुल्तानासाठी पर्शियन भाषेत 'निमतनामा' नावाचे हस्तलिखित तयार करण्यात आले होते.

या ग्रंथात समोशाच्या सर्वात जुन्या पाककृतीचा उल्लेख आढळतो. हे हस्तलिखित मुघल सम्राट अकबर, म्हैसूरचे टिपू सुलतान आणि नंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या हातातून प्रवास करत सध्या ब्रिटिश म्युझियममध्ये जतन करून ठेवण्यात आले आहे.

आजचा समोसा बटाट्याशिवाय अपूर्ण वाटतो, पण ज्या काळात ही रेसिपी लिहिली गेली, त्या काळात भारतीय स्वयंपाकघरात बटाटा आणि मिरचीचा प्रवेश झाला नव्हता.

डॉ. खान यांच्या 'आर्किओ हिस्ट्रीज' या हँडलवर दिलेल्या माहितीनुसार, तेव्हाचा समोसा आजच्या तुलनेत अधिक समृद्ध आणि सुगंधी असायचा.

राजेशाही समोसा रेसिपी कशी होती?

चांगला शिजवलेले खिमा, तितक्याच प्रमाणात बारीक चिरलेला कांदा आणि आल्याचे तुकडे एकत्र करावे.

त्यात लसूण आणि गुलाबाच्या पाण्यात वाटलेले केशर मिसळावे. या मिश्रणात वांग्याचा गर घालून ते समोशाच्या पारीत भरावे आणि हे समोसे साजूक तुपात तळावेत.

राजघराण्यात समोसा बनवण्यासाठी मैदा किंवा कणीक यांसारख्या विविध पिठांचा वापर केला जात असे.

आजच्या चवीपेक्षा ५०० वर्षांपूर्वीची ही चव अधिक 'शाही' आणि सुवासिक होती, असे डॉ. खान यांनी नमूद केले आहे.

साहित्यातील बदलामुळे काळानुसार समोशाचे स्वरूप पूर्णपणे बदलले असले, तरी या ऐतिहासिक रेसिपीने खवय्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे.