निलेश पोतदार
उन्हाळ्यात वाळवणीचे पदार्थ बनवायला सुरूवात होते. त्यातले साल पापड हे पुरण पोळीसोबत खायला खूपच छान वाटतात.
साल पापड बनवण्यासाठी सुरूवातीला तांदुळ पाण्यात भीजत ठेवावेत. यासाठी रेशनचा किंवा जाडा तांदूळ वापरता येईल.
किमान ३ ते ४ दिवस पाण्यात भिजत ठेवा. रोजच्या रोज पाणी बदलावे अन्यथा तांदळाचा आंबुस वास पापडालाही येउ शकतो.
भिजवलेले तांदुळ पाण्यातून काढून हलक्या हाताने पुन्हा धुवून पाण्यातून काढून सुती कापडावर वाळण्यासाठी पसरावेत.
एक दिवसभर हलक्या सूर्य प्रकाशात किंवा फॅनखाली वाळवल्यावर तांदुळ मिक्सला बारीक करून घ्यावेत.
हे पीठ मोठ्या भांड्यात काढून त्यात पाणी घालावे. त्यातल्या गाठी निघण्यासाठी योग्य प्रकारे मिक्स करून घ्यावे. हे पिठ रात्रभर तसेच पाण्यात ठेवून सकाळी भांड्यातील वरचे पाणी काढून टाकावे.
साल पापड बनवताना या तांदळाच्या पिठात चवीनुसार मीठ,जिरे, तीळ घालावे. त्यात पिठाच्या प्रमाणात पाणी मिसळावे. पीठ एकत्र करून घ्यावे.
तयार झालेले पीठ एका प्लेट किंवा ताटावर समप्रमाणात पसरेल इतके पातळ करून घ्यावे.
या पिठाचे सालपापड करण्यासाठी गॅसवर भांड्यात पाणी उकळण्यासाठी ठेवावे. एका छोट्या ताटावर पीठ सगळीकडे पसरवून घेऊन ते ताट किंवा प्लेट उकळणाऱ्या पाण्याच्या भांड्यावर ठेवावे.
2 मिनिट हे पापड उकडून घेऊन सुईच्या साहाय्याने ताटावरून पापड काढून उन्हात वाळवण्यासाठी काही वेळ ठेवावेत. तर नंतर सावलीमध्ये हे पापड सुकवावेत.
ताटावर पीठ घेताना एक चमचा पीठ घ्यावे अधिक घेतल्यास पापड जाड होतात. तर कमी पीठ घेतल्यास पापड तुटू शकतात.