पुढारी वृत्तसेवा
जेव्हा तुम्ही घराबाहेर पडता तेव्हा तुमचे बूट स्वच्छ असतात, पण जसजसा वेळ जातो तसतशी त्यावर बाहेरची धूळ, घाण आणि चिखल चिकटतो.
यामुळे बूट केवळ घाणच होत नाहीत, तर त्यातून तीव्र दुर्गंधही येऊ लागतो.
बऱ्याचदा लोकांना असे वाटते की बुटांचा वास घालवण्याचा एकमेव उपाय म्हणजे ते धुणे, पण तसे अजिबात नाही. दुर्गंध दूर करण्याचे सोपे उपाय पाहा
१. बेकिंग पावडर: बुटांमधून येणाऱ्या वासाचे मुख्य कारण घाम आणि बॅक्टेरिया असतात. हा वास घालवण्यासाठी बेकिंग पावडरचा वापर केला जाऊ शकतो.
बेकिंग पावडर ओलावा शोषून घेते आणि दुर्गंध कमी करते. रात्री बुटांमध्ये थोडी बेकिंग पावडर टाकून ठेवा आणि सकाळी ब्रशने स्वच्छ करा. वास बराच कमी होईल.
२. टी-बॅग: प्रत्येक घरात चहा पिला जातो, पण चहा बनवल्यानंतर आपण टी-बॅग फेकून देतो. मात्र आता असे करू नका. वापरलेली टी-बॅग थंड झाल्यानंतर बुटांमध्ये ठेवा.
चहामधील घटक बॅक्टेरिया कमी करण्यास आणि दुर्गंध शोषण्यास मदत करतात. काही तास टी-बॅग बुटात ठेवल्यास तुम्हाला फरक जाणवेल.
३. मोजे रोज बदला: बहुतेक वेळा दुर्गंध हा घाम आणि बॅक्टेरियामुळे येतो.
जर तुम्ही दररोज स्वच्छ मोजे वापरले आणि एकच जोडी अनेक दिवस वापरणे टाळले, तर बुटांचा वास येण्याची समस्या आपोआप कमी होऊ लागते.
४. एसेंशियल ऑईलचे काही थेंब कापसावर टाकून तो कापूस बुटात ठेवा. यामुळे बुटांना छान सुगंध येईल आणि बॅक्टेरियादेखील कमी होतील.
५. बुटांना ऊन आणि हवा लागणे खूप गरजेचे आहे. दिवसातील काही वेळ बूट मोकळ्या हवेत किंवा उन्हात ठेवा, यामुळे त्यातील ओलावा आणि दुर्गंध दोन्ही कमी होतात.