Raw Jackfruit Curry : कच्च्या फणसाची भाजी आहे सुपरफूडः मधुमेहींसाठीही गुणकारी, या सोप्या टीप्सनी बनवा सहजपणे

Namdev Gharal

कच्च्या फणसाची भाजी (Raw Jackfruit Curry) चवीला तर उत्तम असतेच, पण आरोग्यासाठीही ती एक उत्तम 'सुपरफूड' मानली जाते.

चिकन-मटनला तोडीस तोड असणारा पोत असल्यामुळे अनेकजण याला आवडीने खातात. याचे शरीराला अनेक फायदे आहेत. पण ही भाजी बनवने किचकट असते

कच्च्या फणसात कॅलरीज खूप कमी असतात आणि फायबरचे (फायबर) प्रमाण जास्त असते. यामुळे भाजी खाल्ल्यानंतर बऱ्याच वेळपर्यंत पोट भरलेले राहते, भूक लवकर लागत नाही आणि वजन कमी करण्यास मदत होते.

मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांसाठी कच्चा फणस अत्यंत गुणकारी आहे. कच्च्या फणसाचा ग्लायसेमिक इंडेक्स (Glycemic Index) कमी असतो. यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही.

कच्च्या फणसाची भाजी चवीला अप्रतिम लागते, पण तो कापण्यापासून ते शिजवण्यापर्यंत योग्य पद्धत वापरली नाही, तर भाजी कडवट किंवा चामट होऊ शकते.

कच्च्या फणसामध्ये भरपूर चीक असतो. म्हणूनच फणस कापण्यापूर्वी आपल्या हातांना आणि सुरीला चांगले मोहरीचे तेल किंवा कोणतेही खाद्यतेल लावून घ्या.

फणसाच्या फोडी करताना त्यातील मधला पांढरा, कडक भाग (ज्याला 'कणगी' किंवा 'पाभरी' म्हणतात) पूर्णपणे कापून वेगळा करा. हा भाग भाजीमध्ये शिजत नाही आणि चवही बिघडवतो.

फणस कापल्यानंतर त्याच्या फोडी लगेच मिठाच्या आणि हळदीच्या पाण्यात टाका, यामुळे फणस काळा पडत नाही.

फणस कुकरला शिजवताना फक्त १ ते २ शिट्ट्या काढा. जास्त शिजवल्यास त्याचा गाळ होईल आणि भाजीचा पोत बिघडेल.

कच्च्या फणसाला स्वतःची अशी तीव्र चव नसते, तो मसाल्यांची चव शोषून घेतो. म्हणून यासाठी कांदा, सुखं खोबरं, आले आणि लसूण यांचे घाटी किंवा मालवणी पद्धतीचे वाटण वापरावे.

भाजीत थोडा आंबटपणा आणण्यासाठी कोकम (आमसूल), चिंचेचा कोळ किंवा टोमॅटो आवर्जून वापरा. यामुळे फणसाचा उग्रपणा कमी होतो आणि भाजीला छान चव येते.

जर तुम्हाला या भाजीला हुबेहूब मटणासारखी चव द्यायची असेल, तर फणस उकडल्यानंतर तो मसाल्यात टाकण्यापूर्वी तेलावर हलका सोनेरी रंगावर परतून (Shallow Fry) घ्यावा.

यात भरपूर प्रमाणात असलेले डायटरी फायबर पचनसंस्था निरोगी ठेवते. कच्च्या फणसामध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) आणि अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात.