Pumpkin Leaves : काशीफळाच्या पानांची भाजी, हंगामातच मिळते पण आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर ठेवते!

पुढारी वृत्तसेवा

काशीफळ म्हणजेच लाल भोपळा , भोपळा जसा खाण्यासाठी उत्तम मानला जातो तसेच याच्या पानांच्या भाजीपासूनही अनेक फायदे आपल्याला मिळतात

भोपळा बाजारात सहज उपलब्ध होतो पण ही भाजी सहसा उपलब्ध होत नाही, ऑगस्ट ते डिसेबंर पर्यंत ही भाजी मिळू शकते याचे सेवन आरोग्याला खूप उपयुक्त ठरते.

पाने २ ते ३ वेळा मिठाच्या किंवा स्वच्छ पाण्यात धुवून निथळू द्यावीत आणि नंतर बारीक चिरून घ्यावीत. भाजीची चव आणि पोषण वाढवण्यासाठी त्यात भिजवलेली चणा डाळ, मूग डाळ किंवा शेंगदाण्याचा कूट वापरला जातो.

पचनक्रिया सुधारते: या पानांमध्ये आहारातील चोथा (डाएटरी फायबर) भरपूर प्रमाणात असतो, ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो आणि आतड्यांचे आरोग्य निरोगी राहते.

हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत: पानांमध्ये लोहाचे (Iron) प्रमाण चांगले असल्याने शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी आणि ॲनिमियाचा धोका कमी करण्यासाठी ही भाजी फायदेशीर ठरते.

डोळ्यांचे आरोग्य: यामध्ये व्हिटॅमिन 'ए' मुबलक प्रमाणात असते, जे दृष्टी तीक्ष्ण ठेवण्यास, रातांधळेपणा टाळण्यास आणि डोळ्यांचा कोरडेपणा कमी करण्यास मदत करते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते: व्हिटॅमिन 'सी' आणि विविध अँटीऑक्सिडंट्समुळे शरीराची प्रतिकारक्षमता बळकट होते, ज्यामुळे वारंवार होणाऱ्या संसर्गांपासून संरक्षण मिळते.

हाडांचे बळकटीकरण: पानांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियमसारखी खनिजे आढळतात, ज्यामुळे हाडे आणि दात मजबूत राहण्यास हातभार लागतो.

वजन नियंत्रणासाठी उपयुक्त: या भाजीमध्ये कॅलरीज आणि फॅट्सचे प्रमाण नगण्य असते; फायबर जास्त असल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

त्वचा व केसांसाठी गुणकारी: अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वांच्या प्रभावामुळे त्वचेची चमक वाढते, अकाली वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात आणि केसांचे मूळ मजबूत होते.