पुढारी वृत्तसेवा
डाळी खाल्ल्यानंतर पित्त होणे ही बऱ्याच लोकांमध्ये दिसणारी एक सामान्य समस्या आहे. कारण काही डाळींमध्ये 'ऑलिगोसॅकराइड्स' नावाचे कॉम्प्लेक्स शुगर असते, ज्यामुळे गॅस आणि पित्त तयार होते
कारण डाळींमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फायबर असतात, ज्यामुळे पचनसंस्थेला त्या पचवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. त्यामुळे पित्त वाढते यावर काही सोप्या टिप्स आहेत.
डाळी भिजवून ठेवा: डाळ शिजवण्यापूर्वी किमान ३० मिनिटे ते २ तास कोमट पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे डाळीतील गॅस तयार करणारे घटक कमी होतात आणि डाळ हलकी होते.
वरचा फेस काढून टाका: डाळ उकळताना त्यावर जो पांढरा फेस येतो, तो चमच्याने काढून फेकून द्या. हा फेस पित्त आणि गॅस वाढवण्यास कारणीभूत ठरतो.
कुकरऐवजी पातेल्यात शिजवा: शक्य असल्यास डाळ कुकरऐवजी पातेल्यात उघडी शिजवा, यामुळे पित्त तयार करणारे घटक हवेत उडून जातात.
डाळीला फोडणी देताना खालील गोष्टींचा आवर्जून वापर करा, जेणेकरून डाळ सहज पचेल हिंग आणि जिरे: हिंग गॅस कमी करतो आणि जिरे पचनक्रिया सुधारतात.
आले आणि लसूण: आल्याचा तुकडा किंवा पेस्ट आणि लसूण डाळीचे पित्तकारक गुणधर्म नष्ट करतात. तसेच कढीपत्ता आणि कोथिंबीर: हे दोन्ही घटक शरीराला थंडावा देतात आणि पित्त शमवतात.
रात्री डाळ खाणे टाळा: तूर, चणा किंवा उडदाची डाळ पचायला जड असते. त्यामुळे रात्रीच्या जेवणात या डाळी टाळाव्यात. रात्री मूग डाळ खाणे सर्वात उत्तम.
तुम्हाला जास्त त्रास होत असल्यास मुगाची डाळ (सालीची किंवा पिवळी) खा. ही डाळ पचायला सगळ्यात हलकी असते आणि यामुळे पित्त होत नाही.