Puli Dog - Mop Dog : कुत्रा आहे की फरशी पुसायचा पोछा!

Namdev Gharal

हंगेरियन पुली डॉग (Hungarian Puli Dog) हा एक असा कुत्रा आहे ज्याला फरशी पुसायचा पोछा Mop Dog असे सुद्धा म्हटले जाते कारण याच्या अंगावर अशा केसांच्या जटा असतात की जो जमीनीवर बसला असताना पोछा सारखा दिसतो

Mop Dog : पुली डॉगच्या शरीरावर केसांच्या लांबट, जाड पिळवटलेल्या दोऱ्यांसारख्या जटा असतात. धावताना किंवा बसलेला असताना हा कुत्रा अगदी फरशी पुसणाऱ्या 'फ्लोअर मॉपर'सारखा दिसतो.

हा मूळचा हंगेरीचा असून शतकानुशतके मेंढ्या आणि गुरांचे कळप राखण्यासाठी वापरला जात आहे. लहान आकार असूनही तो लांडग्यांसारख्या जंगली प्राण्यांचा सामना करण्यास मागेपुढे पाहत नाही.

याच्या जाड जटा शरीराला ऊन, पाऊस आणि कडाक्याच्या थंडीपासून वाचवतात. हे केस इतके घट्ट विणलेले असतात की शत्रू प्राण्याने चावा घेण्याचा प्रयत्न केला तरी दात त्वचेपर्यंत पोहोचत नाहीत.

लहान वयात साधे केस: पुली डॉगचे पिल्लू जन्माला येते तेव्हा त्याचे केस मऊ आणि साधे असतात. वयाच्या १ ते २ वर्षांनंतर हळूहळू केसांच्या नैसर्गिक जटा तयार होण्यास सुरुवात होते.

अंगावर जड कोट असूनही हा कुत्रा अत्यंत वेगाने पळतो आणि उंच उड्या मारतो. मेंढ्यांच्या कळपावर नजर ठेवण्यासाठी तो मेंढ्यांच्या पाठीवरून उड्या मारण्यासाठीही प्रसिद्ध आहे

यांच्या केसांना नेहमीच्या कुत्र्यांप्रमाणे विंचरले जात नाही, अन्यथा जटा तुटून जातात. हाताच्या बोटांनीच या जटा वेगळ्या कराव्या लागतात आणि अंघोळ घातल्यानंतर ते वाळवण्यासाठी अनेक तास लागतात.

या कुत्र्याची उंची सर्वसाधारण दीड फूट ते दोन फूटापर्यंत असते तर वजन १५ किलोपर्यंत असते हा मध्यम आकाराचा कुत्रा असतो पण दाट केसांमुळे हा खूप मोठा दिसतो.