पुढारी वृत्तसेवा
लाह्या भात, ज्वारी, बाजरी, मका इत्यादी धान्यांपासून बनवल्या जातात. नुसत्या मीठ-मसाला लावून लाह्या खाल्ल्याने तोंडाला चव येते.
भाताच्या लाह्यांचा सर्वसाधारणपणे औषधी उपयोग केला जातो. मात्र, तांदळाच्या लाह्या मधुमेहींना देत नाहीत. त्यांना गहू किंवा ज्वारीपासून बनविलेल्या लाह्या दिल्या जातात.
आम्लपित्त : लाह्यांचे पीठ करून त्यात मध व खडीसाखर घालून घ्यावे.
उचकी : लाह्यांच्या पिठात सैंधव घालून पाण्यासोबत घ्यावे.
शोष (घशाला पडणारी कोरड) : लाह्यांचा काढा करून घ्यावा. अथवा लाह्यांच्या पिठात मध व गाईचे तूप घालून द्यावे.
पित्त : लाह्यांच्या पिठात लिंबाचा रस, साखर व वेलचीपूड घालून द्यावे.lahya
पित्तामुळे होणारी सर्दी : लाह्यांच्या पिठात मध, खडीसाखर व गाईचे तूप घालून द्यावे.
वात व पित्तामुळे येणारा ताप (वातपित्तज ज्वर) : लाह्या, सुंठ व खारीक यांचा काढा तयार करून गाळावा. त्यात खडीसाखर घालून द्यावा.
अंगदाह, ओकारी, पित्तज्वर : लाह्यांच्या पिठात मध व खडीसाखर कालवून द्यावी.