पुढारी वृत्तसेवा
हिंदू धर्मात 'विवाह' हा अत्यंत पवित्र संस्कार मानला जातो. लग्नानंतर प्रत्येक जोडप्याची इच्छा असते की त्यांचे नाते जन्मोजन्मी टिकून राहावे.
"पुढच्या ७ जन्मात मला हाच पती मिळेल का?" असा प्रश्न अनेक महिलांच्या मनात असतो. याच प्रश्नाचे उत्तर वृंदावनचे प्रेमानंद महाराज यांनी एका सत्संगादरम्यान दिले आहे.
एका महिला भक्ताने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महाराज म्हणाले की, "या जन्मात पती-पत्नीचे एकत्र येणे हे त्यांच्या वैयक्तिक कर्मांवर आणि प्रारब्धावर अवलंबून असते.
"जे या जन्मात पती-पत्नी आहेत, ते पुढच्या जन्मातही पती-पत्नीच असतील असे निश्चित नसते."
महाराजांनी स्पष्ट केले की, मानवी भावना कितीही तीव्र असल्या तरी केवळ इच्छेखातर पुढचा जन्म ठरत नाही. संचित कर्मानुसार प्रत्येक जीवाचा पुढचा प्रवास ठरत असतो.
ते म्हणाले, "जर एखाद्या स्त्रीने किंवा पुरुषाने पूर्ण समर्पणाने ईश्वराची भक्ती केली आणि भगवंताकडे तसा वर मागितला, तर पुढच्या सात जन्मांपर्यंत तोच जीवनसाथी मिळणे शक्य आहे.
ईश्वराची भक्ती कर्माच्या रेषा बदलू शकते हे आपले म्हणणे स्पष्ट करण्यासाठी महाराजांनी एक भावूक कथा सांगितली.
एका पतीचे आपल्या पत्नीवर खूप प्रेम होते, परंतु त्याने कधीही भक्तीचा मार्ग स्वीकारला नाही.
दुसरीकडे त्याची पत्नी परम भक्त होती. मृत्यूंनंतर कर्माच्या गतीने पत्नीचा जन्म राजकुमारी म्हणून झाला, तर पतीला 'हत्ती'ची योनी मिळाली.
मात्र, पत्नीने केलेल्या तीव्र तपश्चर्येमुळे आणि भक्तीमुळे पतीची त्या पशुयोनीतून मुक्तता झाली आणि पुढील जन्मात त्यांचे पुन्हा मिलन झाले.