Prambanan Temple Indonesia: PM मोदींनी भेट दिलेल्या इंडोनेशियातील 'प्रम्बानन' शिवमंदिराची रहस्ये माहिती आहेत का?

पुढारी वृत्तसेवा

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणची टीम इंडोनेशियातील सर्वात मोठ्या 'प्रम्बानन' हिंदू मंदिराचा कायापालट करण्यासाठी सज्ज झाली आहे.

जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियात, ९ व्या शतकातील भगवान शिव, ब्रह्मा आणि विष्णू यांच्या या धामाला भारत आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने चमकावणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडोनेशिया दौऱ्यादरम्यान या विशेष प्रकल्पाची अधिकृत सुरुवात झाली.

इंडोनेशियाच्या 'योग्यकार्ता' येथे असलेले 'प्रम्बानन मंदिर' हे तिथले सर्वात मोठे हिंदू मंदिर संकुल असून, ते युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट आहे.

९ व्या शतकातील या मंदिरात भगवान शिव, ब्रह्मा आणि विष्णू या त्रिमूर्तींची पूजा केली जाते. यामध्ये शिवमंदिर हे सर्वात मुख्य आणि उंच आहे.

इतिहासकारांच्या मते, प्रम्बानन मंदिराची निर्मिती ९ व्या शतकात, म्हणजेच इ.स. ८५० च्या सुमारास हिंदू माताराम (मेदांग) साम्राज्याचे शासक 'रकाई पिकातन' यांनी केली होती.

या मंदिराच्या भिंतींवर रामायण आणि महाभारतातील महत्त्वाचे प्रसंग आणि कथा अतिशय उत्कृष्टपणे कोरल्या आहेत.

या संकुलातील मुख्य शिवमंदिर तब्बल १५४ फूट उंच आहे. या मुख्य मंदिराच्या अगदी मध्यभागी भगवान शिवाची अत्यंत भव्य आणि प्रसन्न मूर्ती स्थापित आहे.

मुख्य शिवमंदिराच्या आतच देवी पार्वती, श्री गणेश आणि महर्षी अगस्त्य यांच्या प्राचीन मूर्ती देखील आहेत.

मुख्य शिवमंदिराच्या एका बाजूला सृष्टीचे निर्माते भगवान ब्रह्मा आणि दुसऱ्या बाजूला पालनकर्ते भगवान विष्णू यांची सुंदर मंदिरे आहेत. या तिन्ही मुख्य मंदिरांच्या समोरच त्यांची वाहने नंदी, हंस आणि गरुड यांची स्वतंत्र मंदिरे बांधलेली आहेत.