Plain of Jars : हे भले मोठे रांजण येथे कोणी आणून ठेवले?

Namdev Gharal

दक्षिण पूर्व आशियातील लाओस या देशात उत्तर भागात असे काही दगडी रांजण किंवा डेरे मोकळ्या मैदानामध्ये हजारो वर्षांपूर्वी ठिकठिकाणी ठेवलेले आढळतात जाणून घेऊया या रहस्यमय राजंणाविषयी

उत्तर लाओसच्या झियांगखोआंग पठारावर हजारो वर्षे जुने आणि प्रचंड आकाराचे दगडी रांजण Stone Jars विखुरलेले आढळतात. या परिसराला जगात 'प्लेन ऑफ जार्स' (Plain of Jars) या नावाने ओळखले जाते.

या परिसरात ९० हून अधिक वेगवेगळ्या ठिकाणी हे दगडी रांजण सापडले असून त्यांची एकूण संख्या २,१०० पेक्षा जास्त आहे. एकाच ठिकाणी काही मोजक्या रांजणांपासून ते ४०० पर्यंत रांजणांचे समूह पाहायला मिळतात.

हे दगडी रांजण दंडगोलाकार असून त्यांची उंची १ मीटर ते ३ मीटर पर्यंत आहे. यातील सर्वात मोठ्या रांजणाचे वजन तब्बल १४ टनांपर्यंत आहे.

बहुतांश रांजण हे वालुकामय दगडांमध्ये कोरलेले आहेत, तर काही ग्रॅनाइट, चुनखडी आणि कोरल दगडापासून बनवलेले आहेत. यातील काही रांजणांवर झाकण म्हणून वापरण्यासाठी दगडी तबकड्याही कोरलेल्या दिसतात.

पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मते, या रांजणांची निर्मिती आग्नेय आशियातील लोहयुगात , म्हणजेच इसवी सन पूर्व ५०० ते इसवी सन ५०० या कालावधीत झाली असावी. हे रांजण सुमारे १,५०० ते २,५०० वर्षे जुने आहेत.

हे रांजण नेमके कशासाठी बनवले गेले, याचे ठोस पुरावे अद्याप मिळालेले नाहीत. मात्र, रांजणांजवळ मानवी हाडे, दात आणि अंत्यसंस्काराच्या वस्तू सापडल्याने, प्राचीन काळी मृतदेह कुजवण्यासाठी किंवा अस्थी जतन करण्यासाठी यांचा वापर होत असावा, असा संशोधकांचा अंदाज आहे.

स्थानिक आख्यायिकेनुसार, प्राचीन काळी या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात तांदळाची दारू साठवून पिण्यासाठी राक्षसांनी हे दगडी रांजण बनवले, अशी लोककथा प्रसिद्ध आहे.

१९६० आणि ७० च्या दशकात व्हिएतनाम युद्धादरम्यान अमेरिकेने लाओसवर प्रचंड बॉम्बवर्षाव केला होता. आजही या परिसरात जमिनीखाली लाखो न फुटलेले बॉम्ब दडलेले आहेत, त्यामुळे पर्यटकांना ठराविक भागातच जाण्याची परवानगी आहे.

या ऐतिहासिक आणि पुरातत्वीय महत्त्वाची दखल घेत, युनेस्कोने (UNESCO) जुलै २०१९ मध्ये 'प्लेन ऑफ जार्स' मधील ११ प्रमुख ठिकाणांचा 'जागतिक वारसा स्थळांच्या' यादीत समावेश केला आहे.