पुढारी वृत्तसेवा
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी किंवा मेंदू तल्लख ठेवण्यासाठी आपण अनेकदा शब्दकोडी सोडवतो किंवा वाचनावर भर देतो.
मात्र, केवळ मानसिक कसरत पुरेशी नसून, मेंदूतील टाकाऊ घटक बाहेर काढण्यासाठी शरीराची हालचाल आणि व्यायाम अत्यंत आवश्यक असल्याचे एका ताज्या संशोधनातून समोर आले आहे.
अमेरिकेतील पेंसिल्वेनिया स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या या दाव्यामुळे व्यायामाचे महत्त्व आता केवळ शरीरापुरते नसून मेंदूच्या आरोग्यासाठीही महत्वाचे आहे.
'नेचर न्यूरोसायन्स' या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, जेव्हा आपण शारीरिक हालचाल करतो तेव्हा आपल्या स्नायूंचे आकुंचन होते. हे आकुंचन शरीरात एका नैसर्गिक 'पंपा'प्रमाणे काम करते.
या प्रक्रियेत रक्ताचा प्रवाह स्पाइनल कॉर्डकडे ढकलला जातो, ज्यामुळे मेंदूमध्ये एक प्रकारचा सूक्ष्म दाब निर्माण होतो. हा दाब मेंदूच्या अंतर्गत भागाची स्वच्छता करण्यास मदत करतो.
मेंदूच्या संरक्षणासाठी 'सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड' नावाचा द्रव पदार्थ असतो. या द्रवाचे मुख्य कार्य मेंदूला पोषण देणे, बाह्य धक्क्यांपासून संरक्षण करणे आणि मेंदूतील विषारी घटक बाहेर फेकणे असते.
जेव्हा आपण शारीरिकदृष्ट्या सक्रिय असतो, तेव्हा निर्माण होणाऱ्या दाबामुळे या द्रवाचा प्रवाह वेगवान होतो. याला वैज्ञानिक भाषेत 'ग्लिम्फॅटिक सिस्टिम' असे म्हटले जाते, जी मेंदूची एक प्रकारची ड्रेनेज यंत्रणा आहे.
उंदरांवर केलेल्या प्रयोगातून असे दिसून आले की, स्नायूंची हालचाल वाढताच त्यांच्या मेंदूतील फ्लुइडचा प्रवाह अधिक वेगवान झाला.
अनेकदा आपण केवळ बुद्धीला चालना देणारे खेळ खेळतो, पण या संशोधनाने हे सिद्ध केले आहे की, मेंदूला दीर्घकाळ कार्यक्षम आणि तरुण ठेवण्यासाठी चालणे, फिरणे आणि शारीरिक व्यायाम करणे हाच सर्वात नैसर्गिक मार्ग आहे.