पुढारी वृत्तसेवा
आज पेट्रोल शंभरीपार गेल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असले, तरी १९४७ मध्ये देशाच्या स्वातंत्र्यावेळी पेट्रोल-डिझेलचे दर काय होते, हे ऐकून आश्चर्य वाटेल.
त्या काळात पेट्रोल अवघे २५ ते २७ पैसे प्रतिलिटर, तर डिझेल १५ ते २० पैसे प्रतिलिटर होते.
म्हणजेच, आज दिल्लीत एका लिटर पेट्रोलसाठी जितके पैसे मोजावे लागत आहेत, तितक्या पैशात स्वातंत्र्याच्या काळात तब्बल ४०८ लीटर पेट्रोल आले असते; तर डिझेल ५०० लीटरपेक्षा जास्त खरेदी करता आले असते.
७८ वर्षांतील इंधन दरांचा इतिहास (प्रतिलिटर दर):
१९४७: २७ पैसे, १९७०: ९० पैसे, १९९०: ४.२० रुपये, २००४: ३३.७१ रुपये, २००८: ५१.०० रुपये, २०१४: ७२.४३ रुपये, २०२६: १०२.०० रुपये
मुंबईत देशातील पहिला पेट्रोल पंप
भारतातील पहिला पेट्रोल पंप १९२८ मध्ये मुंबईत सुरू झाला होता. त्यावेळी पेट्रोलचा दर अवघा ६ पैसे प्रतिलिटर होता.
आजच्या सारख्या डिजिटल स्क्रीन किंवा ऑटोमॅटिक मशिन्स तेव्हा नव्हत्या. एका मॅन्युअल 'हँडपंप'च्या सहाय्याने तेल बाहेर काढून गाड्यांमध्ये भरले जायचे.
त्या काळातील पेट्रोल डिस्पेंसर मशीनवर घड्याळासारखा एक मोठा गोल डायल असायचा, ज्याची सुई फिरून गाडीत किती गॅलन पेट्रोल भरले गेले हे दाखवायची.
१९४७ मध्ये पेट्रोल 'लिटर'मध्ये नाही तर 'गॅलन'मध्ये विकले जायचे. १ गॅलन म्हणजे अंदाजे ४.५ लिटर. त्या काळात भारतीय बाजारपेठेवर बर्मा शेल, स्टैनवैक आणि कॅल्टेक्स सारख्या परदेशी कंपन्यांचे वर्चस्व होते.
आजच्या 'भारत पेट्रोलियम' आणि 'हिंदुस्तान पेट्रोलियम' या कंपन्या याच परदेशी कंपन्यांच्या राष्ट्रीयकरणातून उदयास आल्या आहेत.