पुढारी वृत्तसेवा
आजकाल पर्यावरणाबाबत जागरूकता वाढत आहे. लोक प्लास्टिकचा वापर कमी करत आहेत.
स्ट्रॉचा विचार केला तर अनेक कॅफे, रेस्टॉरंटस् आणि घरांमध्ये प्लास्टिक स्ट्रॉऐवजी पेपर स्ट्रॉचा वापर सुरू झाला आहे.
कागदाचा स्ट्रॉ पर्यावरणासाठी अधिक चांगला आहे आणि आपण पर्यावरणाच्या दृष्टीने चांगले काम केले आहे, असे लोकांना वाटते.
मात्र, बेल्जियममधील एका नव्या अभ्यासाने या समजुतीला धक्का दिला आहे. संशोधकांना आढळून आले की पेपर स्ट्रॉ हे प्लास्टिकच्या स्ट्रॉपेक्षाही अधिक धोकादायक असू शकतात.
या अभ्यासात ३९ ब्रँडस्च्या स्ट्रॉची तपासणी करण्यात आली. यामध्ये पेपर, बांबू, प्लास्टिक, काच आणि स्टेनलेस स्टीलच्या स्ट्रॉचा समावेश होता.
निकाल धक्कादायक होते. सुमारे ९० टक्के पेपर स्ट्रॉ ब्रँडस्मध्ये पॉली आणि परफ्लुओरोअल्किल सब्स्टन्सेस आढळून आले.
यांना ‘फॉरएव्हर केमिकल्स’ असेही म्हटले जाते. कारण ही रसायने सहज नष्ट होत नाहीत आणि दीर्घकाळ पर्यावरणात तसेच मानवी शरीरात टिकून राहू शकतात.
युरोपमध्ये हा पहिलाच अभ्यास असल्याचे सांगितले जाते.