अतिविचार करणे धोकादायक...'या' सात जपानी उपायांनी मन करा शांत..

पुढारी वृत्तसेवा

आजकाल अनावश्यक विचार किंवा अतिविचार (ओवरथिंकिंग) करणे, ही एक सामान्य समस्या बनली आहे. लहानसहान गोष्टींवर सतत विचार करणे, भविष्याची काळजी करणे किंवा एकाच विचारात अडकून पडणे, या गोष्टी आपल्या मनाची शांती हिरावून घेतात.

जपानी जीवनशैलीमध्ये अशा अनेक परंपरा आणि तंत्रे आहेत, जी मन शांत ठेवण्यास, संतुलन राखण्यास आणि अनावश्यक विचारांना थांबवण्यास मदत करतात.

‘शोगनाई’ : जे बदलू शकत नाही, त्याचा स्वीकार करा जी गोष्ट तुमच्या नियंत्रणाबाहेर आहे, त्यावर चिंता करून आपली ऊर्जा वाया घालवू नका.

‘इकिगाई’: तुमच्या जगण्याचा उद्देश शोधा जेव्हा मन चिंतेत अडकते, तेव्हा आपल्या फॅशन, कलाकौशल्ये आणि लहानसहान आनंदाच्या क्षणांवर लक्ष केंद्रित करा.

‘शिनरिन-योकू’: निसर्गात वेळ घालवा याला ‘फॉरेस्ट बाथिंग’ असेही म्हणतात. म्हणजे वनराईतून, बागेतून शांतपणे चालणे आणि निसर्गाचे अनुभव घेणे.

‘झाझेन’: शांत बसून ध्यान करा झाझेन’ ही बसून ध्यान करण्याची एक साधी पद्धत आहे. यात आरामात बसून फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचे असते. विचार येतील; पण त्यांच्याशी लढायचे नाही, फक्त त्यांना ये-जा करताना पाहायचे.

‘वाबी-साबी’: अपूर्णता स्वीकारा ‘वाबी-साबी’ आपल्याला शिकवते की, अपूर्णता देखील सुंदर असू शकते. तुटलेली भांडी किंवा जुन्या लाकडातही एक सौंदर्य असते. ‘परफेक्ट’ बनण्याचा प्रयत्न करताना ओव्हरथिंकिंग वाढते. आयुष्य कधीच पूर्णपणे परिपूर्ण असू शकत नाही, ही जाणीव मनाला खूप हलके करते.

गमन’: संयमाने अडचणींचा सामना करा ‘गमन’ म्हणजे कठीण काळात धैर्य आणि सन्मानाने टिकून राहणे. प्रत्येक समस्येचे लहान-लहान भाग करा आणि एक-एक करून सोडवा. यामुळे मन पळून न जाता मजबूत बनते.

‘इकेबाना’: लहान कामे लक्षपूर्वक करा ‘इकेबाना’ म्हणजे फुलं सजवण्याची कला. याचा मूळ विचार कोणत्याही कामात पूर्ण लक्ष देणे हा आहे.