पुढारी वृत्तसेवा
केळी खरेदी करताना आपण सर्वात आधी त्यांचा रंग पाहतो. अनेकदा काळी पडलेली किंवा जास्त पिकलेली केळी विकत घेणे आपण टाळतो.
घरात असलेली केळी काळी पडू लागली की आपण ती कचऱ्यात फेकून देतो. मात्र, आतापासून तुम्हाला असा निर्णय घेण्यापूर्वी पुन्हा विचार करण्याची गरज पडू शकते.
एका संशोधनात असे आढळून आले आहे की, जास्त पिकलेल्या केळ्यांमध्ये काही नैसर्गिक घटक असतात. प्रयोगशाळेतील चाचण्यांदरम्यान या घटकांचा कर्करोगाच्या पेशींवर सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.
मात्र, शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे की हे एक प्राथमिक संशोधन असून, याला कर्करोगावरील उपचार मानले जाऊ शकत नाही.
अतिपक्व केळ्यांमध्ये काय आढळले ?
जपानी संशोधक एम. शिमिझू आणि त्यांच्या टीमद्वारे प्रकाशित 'बनाना एक्सट्रॅक्ट्स अँड बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी रिसर्च' नावाच्या अभ्यासानुसार ही माहिती समोर आली आहे.
केळी जसजशी जास्त पिकतात आणि त्याची साल गडद तपकिरी किंवा काळी पडते तसे त्यातील काही 'बायोॲक्टिव्ह' संयुगांचे प्रमाण वाढू लागते.
शास्त्रज्ञांनी या संयुगांचा अभ्यास केला असता असे दिसून आले की, प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये त्यांनी कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत केली.
या संशोधनातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, ज्या संयुगांनी कर्करोगाच्या पेशींवर परिणाम केला, त्यांनी निरोगी पेशींचे फारसे नुकसान केले नाही. म्हणूनच शास्त्रज्ञ या विषयावर अधिक सखोल संशोधन करत आहेत.
असे असले तरी, केवळ अतिपक्व केळी खाल्ल्याने कर्करोग टाळता येऊ शकतो, असा निष्कर्ष काढणे चुकीचं ठरेल.