Oscar 2026 : 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' श्रेणीत लिओनार्डोसह ५ दिग्गजांमध्ये चुरस

पुढारी वृत्तसेवा

जागतिक चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या 'ऑस्कर २०२६'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांच्या नामांकनाची अधिकृत यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

यंदाच्या नामांकनांमध्ये हॉलिवूडचा सुपरस्टार लिओनार्डो डिकॅप्रिओ याचे वर्चस्व पाहायला मिळत असून, त्याच्यासह इतर चार कसलेल्या अभिनेत्यांमध्ये पुरस्कारासाठी 'कांटे की टक्कर' होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

एकेडमी अवॉर्ड्सने लिओनार्डो डिकॅप्रिओ याला २०२५ मधील गाजलेल्या 'वन बॅटल आफ्टर अनदर' या चित्रपटातील त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता श्रेणीत नामांकन दिले आहे.

त्याच्यासोबतच तरुण पिढीचा लाडका अभिनेता टिमोथी चालमेट यानेही 'मार्टी सुप्रीम' या चित्रपटासाठी या शर्यतीत आपले स्थान पक्के केले आहे.

यंदाची नामांकने पाहता विजयाचा मुकुट कोणाच्या शिरावर सरेल, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मायकल बी. जॉर्डन

एप्रिल २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सिनर्स' या थरारपट (हॉरर-अ‍ॅक्शन) मधील दमदार भूमिकेसाठी जॉर्डनला नामांकन मिळाले आहे.

एथन हॉक

ऑक्टोबर २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'ब्लू मून' या म्युझिकल-ड्रामा चित्रपटातील संवेदनशील अभिनयासाठी एथनने या यादीत स्थान मिळवले आहे.

वॅगनर मौरा

नोव्हेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'द सीक्रेट एजंट' या चित्रपटातील प्रभावी कामगिरीच्या जोरावर वॅगनर मौरा या प्रतिष्ठेच्या शर्यतीत आपली उपस्थिती नोंदवण्यात यशस्वी ठरला आहे.