Onion Cutting Tips: कांदा कापताना डोळ्यांत पाणी येऊ नये म्हणून काय करावे?

पुढारी वृत्तसेवा

स्वयंपाकघरात काम करताना एक असं काम आहे जे करायला अनेकजण टाळाटाळ करतात, कारण या कामात उगाचच रडावं लागतं. ते काम म्हणजे कांदा कापणे.

काही सोप्या टिप्सच्या मदतीने तुम्ही कांदा कापलात, तर तुम्हाला अजिबात अश्रू गाळण्याची गरज पडणार नाही.

कांदा कापताना किंवा सोलताना त्यातील सल्फर कंपाउंड हवेच्या संपर्कात येतात आणि गॅस तयार करतात. हाच गॅस डोळ्यांपर्यंत पोहोचतो, ज्यामुळे जळजळ होऊन पाणी येते. मात्र, ही प्रक्रिया नियंत्रित करणे शक्य आहे.

जर तुम्हाला कांदा कापताना रडायचे नसेल, तर कापण्यापूर्वी तो १० ते १५ मिनिटे फ्रीजमध्ये किंवा थंड पाण्याच्या भांड्यात ठेवा.

थंडाव्यामुळे सल्फर गॅस तयार होण्याची प्रक्रिया मंदावते, ज्यामुळे डोळ्यांची जळजळ होत नाही.

दुसरी पद्धत म्हणजे कांदा नळाच्या वाहत्या पाण्याखाली सोलणे. यामुळे कांद्यातून बाहेर पडणारा गॅस पाण्यात विरघळतो आणि हवेत पसरत नाही. परिणामी, तो डोळ्यांपर्यंत पोहोचण्याचा धोका कमी होतो.

कांदा कापण्यासाठी नेहमी धारदार चाकू वापरा. बोथट चाकूमुळे कांद्याच्या पेशी जास्त प्रमाणात चुरडल्या जातात, ज्यामुळे जास्त गॅस बाहेर पडतो.

एक रंजक पद्धत म्हणजे तोंडात पाणी भरून कांदा सोलणे. ग्रामीण भागात अनेक महिला ही पद्धत वापरतात.

हे ऐकायला जरी विचित्र वाटत असले तरी अनेकांसाठी ते प्रभावी ठरते. असे मानले जाते की यामुळे श्वास घेण्याची पद्धत बदलते आणि गॅस डोळ्यांपर्यंत पोहोचत नाही.

79ac100c-f72e-4115-99ae-2a0ea38da5a9