पुढारी वृत्तसेवा
झोपताना डोक्याखाली घेतलेली उशी आरामदायी झोपेसाठी महत्त्वाची असते. मात्र, तीच उशी जुनी झाल्यानंतर आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते.
चांगल्या दर्जाच्या उशीचे आयुष्य साधारण १२ ते १८ महिने असते. उशी बाहेरून व्यवस्थित दिसत असली तरी कालांतराने तिच्या आतील भागात बॅक्टेरिया, धूळ आणि अॅलर्जी निर्माण करणारे घटक जमा होऊ शकतात.
त्वचा आणि केसांच्या समस्या
जुन्या उशीवर साचलेली घाण आणि बॅक्टेरियामुळे चेहऱ्यावर वारंवार मुरुम, पिंपल्स तसेच त्वचेची अॅलर्जी होण्याची शक्यता वाढते. यासोबतच केसांशी संबंधित समस्याही वाढू शकतात.
श्वसनाच्या समस्या
उशीच्या आत धुळीतील सूक्ष्म कीटक आणि बुरशी वाढू शकते. झोपताना त्यांचा संपर्क श्वसनमार्गाशी येत असल्याने सकाळी उठल्यानंतर सतत शिंका येणे, नाक बंद होणे किंवा दम्यासारख्या समस्या जाणवू शकतात.
मान आणि खांदेदुखी
दीर्घकाळ वापर केल्याने उशीचा आकार बदलतो आणि ती दबून जाते. त्यामुळे झोपताना मानेचा योग्य आधार मिळत नाही. परिणामी सकाळी उठल्यानंतर मान आणि खांद्यांमध्ये वेदना जाणवू शकतात.
उशी कधी बदलावी?
यासाठी उशीला मधोमध दुमडून पाहा. दुमडलेली उशी सोडल्यानंतर ती लगेच पूर्वीच्या आकारात आली, तर तिची स्थिती ठीक असल्याचे मानले जाऊ शकते.
मात्र, उशी दुमडलेलीच राहिली किंवा ती दबलेली दिसली, तर तिचा आतील आधार देणारा भाग कमकुवत झाल्याचे समजावे.
अशावेळी नवीन उशी घेण्याचा विचार करणे योग्य ठरू शकते.