पुढारी वृत्तसेवा
वर्ष २०२५ मधील सर्व प्रमुख देशांचे एकदिवसीय (ODI) सामने आता संपले आहेत. भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी हे वर्ष सुवर्णअक्षरांनी लिहिण्यासारखे ठरले, कारण भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले.
भारताने या वर्षात एकूण १४ एकदिवसीय सामने खेळले, ज्यापैकी ११ सामन्यांत विजय मिळवला, तर केवळ ३ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला.
या यशस्वी वर्षानंतर, २०२५ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या अव्वल गोलंदाजांचा आढावा घेऊया
मॅट हेन्री : न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री या वर्षीचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याने १३ सामन्यांत अवघ्या १८.५८ च्या सरासरीने सर्वाधिक ३१ बळी टिपले. ५.१६ च्या इकॉनॉमी रेटसह त्याने फलंदाजांना जखडून ठेवले.
विशेष म्हणजे, या वर्षात त्याने तीन वेळा डावात ४ बळी आणि एकदा ५ बळी घेण्याची किमया साधली. त्याच्या नावावर आता एकूण १७२ एकदिवसीय बळी जमा झाले आहेत.
आदिल रशीद : इंग्लंडचा लेग स्पिनर आदिल रशीदने २०२५ मध्ये १५ सामन्यांत २३.६३ च्या सरासरीने ३० बळी मिळवले. ६३ धावांत ४ बळी ही त्याची या वर्षातील सर्वोत्तम कामगिरी ठरली. रशीदच्या खात्यात आता १५८ सामन्यांत एकूण २३५ बळी आहेत.
जेडन सील्स : वेस्ट इंडीजच्या जेडन सील्सने या वर्षी आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. त्याने १२ सामन्यांत १८.१४ च्या उत्कृष्ट सरासरीने २७ बळी घेतले. १८ धावांत ६ बळी ही त्याची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी याच वर्षात नोंदवली गेली. त्याने आतापर्यंत २९ सामन्यांत ४० बळी मिळवले आहेत.
मिचेल सँटनर : न्यूझीलंडचा फिरकीपटू मिचेल सँटनरसाठी देखील २०२५ हे वर्ष फलदायी ठरले. त्याने १७ सामन्यांत २५ बळी घेतले. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये सँटनरने ९ बळी मिळवून स्पर्धेत संयुक्तपणे दुसरे स्थान पटकावले होते. या स्पर्धेतील त्याचा ४.८० चा इकॉनॉमी रेट अत्यंत प्रभावी ठरला.
भारताचा 'हुकूमी एक्का': हर्षित राणा
भारतीय गोलंदाजांचा विचार केला तर, युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणा याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. २०२५ मध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेण्याचा मान त्याने मिळवला आहे. हर्षितने ११ सामन्यांत २५.५५ च्या सरासरीने एकूण २० बळी घेतले. ३९ धावांत ४ बळी ही त्याची या वर्षातील सर्वोत्तम कामगिरी ठरली.