October heat : ‘ऑक्टोबर हीट‘ म्हणजे काय? का जाणवते इतकी उष्णता?

Namdev Gharal

पावसाळ्यानंतर आणि हिवाळ्यापूर्वी अचानक असह्य उकाडा का जाणवतो, आणि याला ऑक्टोबर हीट असे म्हणतात काय असते या दिवसात उष्णता वाढायचे कारण जाणून घेऊ

याला 'ऑक्टोबर हीट' नाव का पडले? सलग चार महिने पावसाळी गारवा अनुभवल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात अचानक कडक ऊन पडते. म्हणूनच या तीव्र उकाड्याला 'ऑक्टोबर हीट' म्हणतात.

कॅलेंडरनुसार हा महिना ऑक्टोबर असल्याने आणि या काळात उष्णतेची दुसरी लाट (Second Summer) जाणवत असल्याने हवामानशास्त्र आणि सर्वसामान्य भाषेत याला 'October Heat' म्हटले जाते.

परतीचा पाऊस आणि बदलणारे वारे सप्टेंबरअखेर नैर्ऋत्य मोसमी वारे (मान्सून) माघार घेऊ लागतात. या बदलामुळे हवेचा दाब आणि दिशेत अचानक मोठा बदल घडून येतो.

ढग गायब, थेट सूर्यप्रकाश : परतीच्या प्रवासात आकाशातील पावसाचे ढग पूर्णपणे नाहीसे होतात. स्वच्छ आकाशामुळे सूर्याची थेट किरणे जमिनीवर पडून तापमान झपाट्याने वाढते.

हवेतील प्रचंड दमटपणा : पावसाने भिजलेली जमीन कडक उन्हामुळे तापते आणि पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होते. यामुळे हवेतील दमटपणा प्रचंड वाढतो.

शरीराला चटके का बसतात? : आर्द्रता जास्त असल्याने शरीराला येणारा घाम सुकत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष तापमानापेक्षा उष्णतेचा दाह आणि अस्वस्थता जास्त भासते.

दिवसा चटका, रात्री गारवा : ऑक्टोबरमध्ये दिवसाचे तापमान ३५°C ते ३८°C पर्यंत जाते, तर रात्री गारवा असतो. दिवसा आणि रात्रीच्या या तापमानातील फरकामुळे उकाडा अधिक तीव्र वाटतो.

फक्त भारतातच असते का? : पाकिस्तान, बांगलादेश या मान्सून देशांत ही उष्णता जाणवते. तर पाश्चात्त्य देशांमध्ये शरद ऋतूत अचानक वाढणाऱ्या उन्हाळ्यासारख्या उष्णतेला 'इंडियन समर' (Indian Summer) म्हणतात.

हा उकाडा कधी संपतो? नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासून उत्तरेकडून थंड वारे वाहू लागतात आणि ऑक्टोबर हीटचा त्रास संपून गुलाबी थंडी सुरू होते.