पुढारी वृत्तसेवा
केस गळणे, कोंडा आणि केसांचा कोरडेपणा या समस्यांमुळे त्रस्त असाल तर कडुनिंब तुमच्यासाठी खरोखरच एक वरदान ठरू शकते.
कडुनिंबामध्ये जिवाणूनाशक, बुरशीनाशक आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. हे गुणधर्म टाळूचे संसर्गापासून रक्षण करतात आणि केसांच्या मुळांना पोषण देतात.
कडुनिंब आणि दही हेअर मास्क
जर कोंडा आणि टाळूला खाजेची समस्या असेल तर, दोन चमचे कडुनिंबाची पावडर अर्धा कप ताज्या दह्यामध्ये मिसळा. हे मिश्रण तुमच्या टाळूवर लावा आणि १५ मिनिटांनंतर थंड पाण्याने धुवून टाका.
कडुनिंब आणि खोबरेल तेल मास्क
केस तुटणे, केस गळणे या समस्यांसाठी मूठभर कडुनिंबाच्या पानांपासून बनवलेल्या पेस्टमध्ये ३-४ चमचे कोमट खोबरेल तेल मिसळा. हे मिश्रण टाळूवर लावून मालिश करा. एक तासाने शॅम्पूने केस धुवून टाका.
कडुनिंब आणि मध हेअर मास्क
कोरड्या, निर्जीव आणि विस्कटलेल्या केसाना नवचैतन्य निर्माण करण्यासाठी दोन चमचे कडुनिंबाची पेस्ट, एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस एकत्र करा.
हे मिश्रण टाळूपासून सुरू करून केसांच्या टोकांपर्यंत लावा. हा मास्क केसांवर २० मिनिटे तसाच राहू द्या आणि त्यानंतर पाण्याने केस धुवून टाका.
कडुनिंब आणि मेथीचे दाणे मास्क
मेथीचा वापर कडुनिंबासोबत केला जातो, तेव्हा ते टाळूमध्ये होणारे रक्तभिसरण सुधारण्यास मदत करतात.
हा मास्क तयार करण्यासाठी, दोन मोठे चमचे मेथीचे दाणे (रात्रभर भिजवलेले) आणि १०–१२ कडुलिंबाची पाने एकत्र वाटून पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांना लावा आणि ३० मिनिटांनंतर शॅम्पूने धुवून टाका.