पुढारी वृत्तसेवा
शारदीय नवरात्री हा माता दुर्गेच्या उपासनेचा आणि शक्तीच्या आराधनेचा पवित्र सण आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते.
या काळात उपासना, व्रतवैकल्ये आणि धार्मिक विधींसोबतच सोने-चांदी खरेदी करण्यालाही विशेष महत्त्व आहे.
नवरात्रीत सोनं किंवा चांदी खरेदी केल्याने घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे अनेक जण या शुभ काळात सोन्या-चांदीचे दागिने किंवा अन्य वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य देतात.
हिंदू संस्कृतीमध्ये सोन्याचा संबंध धन आणि समृद्धीची देवता माता लक्ष्मीशी जोडला जातो. सोने हे ऐश्वर्य, वैभव आणि संपन्नतेचे प्रतीक मानले जाते.
नवरात्रीच्या काळात सोन्याची खरेदी केल्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि आर्थिक भरभराट होते, अशी श्रद्धा आहे. तसेच, सोन्याला पवित्र धातू मानले जात असल्याने शुभ कार्यांमध्ये त्याला विशेष स्थान दिले जाते.
धार्मिक मान्यतेनुसार, चांदीचा संबंध चंद्राशी जोडला जातो. चंद्र हा मनाची शांतता आणि भावनिक संतुलनाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे चांदीची खरेदी शुभ मानली जाते.
नवरात्रीच्या काळात चांदीच्या वस्तू किंवा दागिने खरेदी केल्याने घरात शांतता, समाधान आणि सकारात्मकता नांदते, अशी श्रद्धा आहे.
नवरात्रीत खरेदी केलेले सोने किंवा चांदी फक्त एक वस्तू नसते, तर ती शुभ ऊर्जा घेऊन येते. यामुळे घरात सकारात्मकता वाढते आणि सुख-समृद्धी नांदते.
नवरात्रीतील अष्टमी आणि नवमी या तिथींना धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. तसेच, दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. त्यामुळे या दिवशी सोने-चांदी खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो.
नवरात्रीत सोने-चांदी खरेदी करणे हे केवळ आर्थिक व्यवहारापुरते मर्यादित नसून, धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरेशी जोडलेले आहे.