The Lost World : २ अब्ज वर्षे जुने खडक, ‘ज्युरासिक वर्ल्ड’ची कल्पना सूचलेला गूढ पर्वत!

Namdev Gharal

ॲमेझॉनच्या जंगलानी वेढलेल्या व्हेनेझुएला या देशात असे काही पर्वत आहेत . ज्याचे गूढं आजतागायत कोणालाही सुटलेले नाही, Guiana Shield म्हणून यांची ओळख आहे, जाणून घेऊ त्‍यांच्याविषयी

सर आर्थर कॉनन डॉयल यांची प्रसिद्ध कादंबरी 'द लॉस्ट वर्ल्ड' (The Lost World) या पर्वतांच्या गूढ रचनेवरच आधारित आहेत. याच कांदबरीच्या प्रेरणेतून पुढे ज्युरासिक वर्ल्ड हा चित्रपट निर्माण झाला.

ही जगातील अतिप्राचीन पर्वतरांग आहे : हा भूभाग पृथ्वीवरील सर्वात जुन्या खडकांपैकी एक असलेल्या 'गियाना शील्ड'चा भाग आहे. हे खडक सुमारे १.७ ते २ अब्ज वर्षे जुने मानले जातात.

सपाट माथ्याचे पर्वत : या पठारी भागात टेबलसारखे सपाट माथा असलेले आणि सरळ तुटलेले कडे असलेले वैशिष्ट्यपूर्ण डोंगर आढळतात, ज्यांना स्थानिक पेमोन भाषेत 'टेपुई' (Tepui) म्हणजेच "देवांचे घर" म्हटले जाते.

औयन-टेपुईवरून कोसळणारा 'एंजल फॉल्स' इतका उंच आहे (९७९ मीटर) की, त्याचे पाणी खाली जमिनीवर पोहोचण्याआधीच जोरदार वाऱ्यामुळे हवेत विरघळून त्याचे रूपांतर केवळ धुके आणि सूक्ष्म तुषारांच्या ढगात होते.

भौगोलिक विस्तार: हा प्रदेश प्रामुख्याने व्हेनेझुएलाच्या दक्षिण-पूर्व भागात बोलिव्हार आणि अ‍ॅमेझोनास राज्यांमध्ये पसरलेला असून, त्याच्या सीमा ब्राझिल आणि गयानापर्यंत पोहोचतात.

माउंट रोराईमा : या पर्वतरांगेतील सर्वात प्रसिद्ध शिखर म्हणजे माउंट रोराईमा यांची उंची सुमारे २,८१० मीटर असून. हा पर्वत व्हेनेझुएला, ब्राझिल आणि गयाना या तिन्ही देशांच्या सीमा एकत्र आणतो.

विशिष्ट 'बेटांसारखी' परिसंस्था: टेपुई पर्वतांचे कडे हजारो फूट सरळ रेषेत खोल असल्यामुळे प्रत्येक पर्वताचा माथा सभोवतालच्या जंगलापासून पूर्णपणे विलग झाला आहे. यामुळे त्यांना "आकाशातील बेटे" (Islands in the Sky) म्हटले जाते.

हा संपूर्ण भाग व्हेनेझुएलाच्या 'कॅनाइमा राष्ट्रीय उद्यानात' समाविष्ट असून, याच्या अद्वितीय निसर्गामुळे युनेस्कोने (UNESCO) याला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.