पुढारी वृत्तसेवा
जगभरात अशी काही ठिकाणे आहेत, जिथे सामान्य माणसांना प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे.
ही ठिकाणे एक तर इतकी रहस्यमय, धोकादायक किंवा वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाची आहेत की, सरकारने त्यांच्या संरक्षणासाठी कडक निर्बंध लादले आहेत.
सर्टसी, आईसलँड हे अटलांटिक महासागरात 1963 ते 1967 दरम्यान ज्वालामुखीच्या उद्रेकातून नवे बेट तयार झाले.
इथले नैसर्गिक वातावरण मानवी हस्तक्षेपाशिवाय टिकून राहावे म्हणून फक्त निवडक वैज्ञानिकांनाच इथे संशोधन करण्याची परवानगी आहे. याला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.
ब्राझीलमधील इल्हा दा क्वेमादा ग्रांडे (स्नेक आयलंड) हे साओ पाऊलोजवळ असलेले बेट जगातील सर्वात विषारी आणि दुर्मीळ प्रजातीच्या गोल्डन लांसहेड वायपर या सापांचे निवासस्थान आहे.
या सापाचे विष इतके धोकादायक आहे की, माणसाच्या जीवाला त्वरित धोका निर्माण होतो. लोकांची सुरक्षा आणि सापांचे संरक्षण यासाठी इथे प्रवेश पूर्णपणे बंद आहे.
एरिया 51, यूएसए हे नेवाडाच्या वाळवंटात असलेले अमेरिकेचे अत्यंत गुप्त लष्करी तळ आहे. येथे नवीन लढाऊ विमाने आणि गुप्त तंत्रज्ञानाची चाचणी केली जाते.
राष्ट्रीय सुरक्षेमुळे याच्या आसपासच्या भागातही कोणालाही जाण्याची परवानगी नाही. हे संपूर्ण हवाई क्षेत्र नो फ्लाय झोन आहे.
फ्रान्समधील लास्को गुंफा याठिकाणी सुमारे हजारो वर्षांपूर्वीची अमूल्य चित्रकला आहे. पर्यटकांच्या गर्दीमुळे होणाऱ्या कार्बन डायऑक्साईड, दमट हवा आणि बुरशीमुळे पेंटिंग्ज खराब होऊ लागल्याने 1963 मध्ये ही गुहा कायमस्वरूपी बंद करण्यात आली.