Mimic Octopus : असा ऑक्टोपस जो इतर सागरी प्राण्यांचे हुबेहुब सोंग घेतो!

Namdev Gharal

समुद्राच्या तळाशी राहणाऱ्या अनेक जिवांमध्ये ऑक्टोपस हा खूप हुशार मानला जातो. यातील Mimic Octopus तर इतर समुद्री जिवांची नक्कल करण्यात पटाईत असतो

हा केवळ रंग न बदलता शरीराचा आकार आणि हालचाली बदलून इतर समुद्री जीवांची हुबेहूब नक्कल करतो. शत्रू किंवा परिस्थितीनुसार हा एकाच वेळी अनेक विषारी जीवांचे सोंग घेऊ शकतो.

लायनफिश, विषारी समुद्री साप आणि चपटी मासोळी (Flatfish) यांचे रूप घेणे ही याची खासियत आहे.त्यामुळे मोठे शिकारी जीव याला विषारी समजून याच्यावर हल्ला करण्याचे टाळतात.

समोर कोणत्या प्रकारचा शत्रू आहे, हे ओळखून हा त्या शत्रूच्या नैसर्गिक भक्षकाचे रूप धारण करतो. उदा. डॅमसेलफिशने हल्ला केल्यास तो लगेच त्या माशाचा शत्रू असलेल्या पट्टेरी समुद्री सापासारखा बनतो.

हा मुख्यतः इंडोनेशिया आणि मलेशियन सागरी परिसरातील उथळ आणि गाळाच्या समुद्रात आढळतो.१९९८ मध्ये इंडोनेशियाच्या सुलावेसी किनारपट्टीजवळ शास्त्रज्ञांनी याचा पहिल्यांदा शोध लावला.

याच्या शरीरात हाडे नसल्याने हा स्वतःचे स्नायू हवे तसे वाकवून कोणत्याही साच्यात बसवू शकतो. त्वचेतील 'क्रोमॅटोफोर्स' पेशींच्या साहाय्याने हा सेकंदाच्या आत शरीराचा रंग आणि पोत बदलतो.

इतर ऑक्टोपस रात्री बाहेर पडतात, पण मिमिक ऑक्टोपस दिवसाही अन्न शोधण्यासाठी बिनधास्त फिरतो. नक्कल करण्याच्या अद्वितीय कौशल्यामुळे त्याला दिवसा उघड्यावर फिरताना शिकारींची फारशी भीती वाटत नाही.

लहान खेकडे, कोळंबी आणि लहान मासे हे याचे मुख्य खाद्य आहे. कधी एखाद्या विषारी प्राण्याचे सोंग घेऊन तर कधी तळाशी वाळूत लपून हा शिकार पकडतो.

गरज पडल्यास हा काळी शाई फेकून पळ काढतो किंवा लगेच वाळूच्या रंगाशी एकरूप होतो. शत्रू खूपच जवळ आल्यास अखेरचा उपाय म्हणून अत्यंत धोकादायक प्राण्याचे रूप घेऊन त्याला घाबरवतो.