Milk Jalebi Health benefits: दूध-जिलेबी खाण्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे

पुढारी वृत्तसेवा

दूध-जिलेबीचे कॉम्बिनेशन चवीला अत्यंत अप्रतिम लागते; मात्र, हे मिश्रण आरोग्यासाठी किती योग्य आणि किती अयोग्य आहे? याविषयी आरोग्य तज्ज्ञांनी दिलेली महत्त्वाची माहिती जाणून घ्या.

दूध हे पूर्णान्न मानले जाते. दुधात कॅल्शियम, प्रथिने आणि आवश्यक जीवनसत्त्वे असतात, जी हाडे मजबूत करण्यास आणि स्नायूंच्या विकासासाठी मदत करतात.

दुसरीकडे, जिलेबीमध्ये शर्करा आणि कर्बोदके भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते.

तज्ज्ञांच्या मते, खूप थकवा आला असल्यास किंवा झटपट ऊर्जेची गरज असल्यास दूध-जिलेबी फायदेशीर ठरू शकते. विशेषतः हिवाळ्यात याचे सेवन केल्याने शरीरात उष्णता टिकून राहण्यास मदत होते.

अतिसेवनाचे धोके

जिलेबीमुळे तात्काळ ऊर्जा मिळत असली तरी ती तळलेली आणि पाकदार असल्याने त्यात कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते.

Neha Khanuja

त्यामुळे याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास वजन वाढणे आणि रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्याचा धोका असतो.

तसेच, तळलेले पदार्थ आणि दूध एकत्र खाल्ल्याने काहींची पचनसंस्था बिघडू शकते. यामुळे गॅस, ॲसिडिटी आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो. विशेषतः मधुमेहाच्या रुग्णांनी जिलेबी खाणे पूर्णपणे टाळावे, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

आहारतज्ज्ञांच्या मते, कुठलाही पदार्थ मर्यादित प्रमाणात खाल्ला तर तो हानिकारक ठरत नाही. त्यामुळे दूध-जिलेबी रोज खाण्याऐवजी कधीतरी 'ट्रीट' म्हणून खाणे योग्य ठरेल.

आठवड्यातून एकदा किंवा एखाद्या खास प्रसंगी मर्यादित प्रमाणात दूध-जिलेबी खाण्यास हरकत नाही, मात्र दररोज याचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.