Mauro Morandi : असा अवलिया जो ३२ वर्षे राहिला एकटाच एकाकी निर्जन बेटावर!

Namdev Gharal

२००० साली आलेल्या कास्ट अवे चित्रपटात टॉम हॅक्स एका अपघाताने एका निर्जन बेटावर ५ वर्षे एकटाच अडकतो असे दाखवले आहे पण खऱ्या आयुष्यात एक असा व्यक्ति होता जो ३२ वर्ष एका निर्जन बेटावर राहिला होता

या अवलियाचे नाव होते माऊरो मोरांडी (Mauro Morandi) दक्षिण इटलीमधील अपुलिया प्रांतालित पेशाने शारिरीक शिक्षक असलेल्या मोरांडी यांना समाजाचा कंटाळा आला होता

१९८९ मध्ये मोरांडी आधुनिक समाजाच्या गजबजाटाला आणि भौतिकवादाला कंटाळले होते. त्यांनी पॅसिफिक महासागरातील एका निर्जन बेटावर जाऊन नव्याने आयुष्य सुरू करण्यासाठी बोट काढली होती.

प्रवासादरम्यान त्यांच्या बोटीचे इंजिन नादुरुस्त झाले आणि ते दक्षिण इटलीजवळील बुडेली (Budelli) या अवघ्या १ चौरस किलोमीटरपेक्षा लहान असलेल्या बेटावर पोहोचले. तेथील शांततेने त्यांचे मन इतके जिंकले की त्यांनी पुढे न जाण्याचा निर्णय घेतला.

त्या काळात बुडेली बेटाची मालकी एका खाजगी कंपनीकडे होती. तिथल्या जुन्या रखवालदाराने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला होता. मोरांडी यांनी लगेच ती संधी साधली आणि बेटाचे अधिकृत रखवालदार बनून तिथेच तळ ठोकला

बुडेली बेट त्याच्या अत्यंत दुर्मिळ अशा गुलाबी रंगाच्या वाळूच्या किनाऱ्यासाठी (Spiaggia Rosa) जगभर प्रसिद्ध आहे. पर्यटक ही गुलाबी वाळू चोरून नेऊ नयेत म्हणून मोरांडी यांनी ३ दशके या किनाऱ्याचे रक्षण केले.

ना शेजारी, ना वीज, ना पाण्याचा नळ—मोरांडी यांनी जुन्या लाकडी झोपडीत सौरऊर्जा आणि पावसाच्या पाण्याचा वापर करून ३२ वर्षे येथे एकाकी जीवन व्यतित केले

मोरांडी दिवसभरात तत्वज्ञानाची पुस्तके वाचत, समुद्राने वाहून आणलेल्या लाकडावर कोरीव काम करत आणि निसर्गाचे निरीक्षण करत. बेटावरील जंगली पक्षी, मांजरी आणि कुत्रे हेच त्यांचे खरे सोबती होते.

१९९१ मध्ये आलेल्या शतकातील सर्वात भीषण वादळाचे मोरांडी साक्षीदार होते. त्यावेळी उसळलेल्या १८ फूट लाटा पाहून त्यांनी म्हटले होते, "तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी निसर्गापुढे माणूस एका मुंगीसारखा क्षुल्लक आहे."

२०१८ नंतर पर्यटकांसाठी तिथे वाय-फाय राउटर बसवण्यात आले. सुरुवातीला इंटरनेटचा पत्ता नसलेले मोरांडी नंतर इन्स्टाग्रामवर सक्रिय झाले. त्यांनी शेअर केलेले बुडेलीचे मनमोहक फोटो पाहून जगभरातून लाखो लोक त्यांचे चाहते बनले.

जेव्हा बुडेली बेटाचा समावेश राष्ट्रीय उद्यानात झाला, तेव्हा प्रशासनाने मोरांडी यांना बेट रिकामे करण्याची नोटीस बजावली. त्यांना बेटावरच राहू द्यावे म्हणून जगभरातून ७० हजारांपेक्षा जास्त लोकांनी स्वाक्षऱ्यांची मोहीम चालवली होती.

प्रशासकीय दबावामुळे अखेर मे २०२१ मध्ये, वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी जड अंतःकरणाने बुडेली बेटाचा निरोप घेतला आणि जवळच्या ला मॅडालेना शहरात एका अपार्टमेंटमध्ये स्थायिक झाले.

३ जानेवारी २०२५ साली त्‍यांनी या जगाचा निरोप घेतला पण तब्बल ३२ वर्षे निर्जन बेटावर एकाकी राहण्याचा त्यांचा प्रवास इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला.