NASA Mars Photos: मंगळावर पाणी सापडलं? २० वर्षांनंतर ऑर्बिटरने पाठवले फोटो, नासाने केले शेअर

पुढारी वृत्तसेवा

ब्रह्मांडात पृथ्वीशिवाय इतर कुठे जीवनसृष्टी आहे का? या प्रश्नाचा शोध घेणाऱ्या संशोधकांसाठी एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे.

अमेरिकन अंतराळ संस्था 'नासा'ने मंगळ ग्रहाची काही अशी छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत, ज्यांनी खगोलशास्त्रज्ञांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे.

या फोटोंमुळे मंगळाच्या पृष्ठभागावर पाण्याचे अस्तित्व असल्याचे ठोस पुरावे मिळाले आहेत.

नासाने ऑगस्ट २००५ मध्ये 'मार्स रिकॉनसेंस ऑर्बिटर' (MRO) हे यान प्रक्षेपित केले होते. हे ऑर्बिटर १० मार्च रोजी मंगळाच्या वातावरणात पोहोचले असून तेथून त्याने अतिशय स्पष्ट फोटो पाठवले आहेत.

तांबड्या धुळीच्या पृष्ठभागाखाली अजूनही बर्फाचे साठे आहेत. पुरेशा दाबाखाली आणि उष्णतेमध्ये तिथे द्रव स्वरूपात पाणी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या छायाचित्रात एका ताज्या उल्कापातामुळे झालेला खड्डा आहे, ज्यातून निळ्या-राखाडी रंगाचा जमिनीखालील भाग उघडा पडला आहे. तो निळा रंग म्हणजे प्रत्यक्षात पाण्याचा बर्फ आहे.

हे ऑर्बिटर मंगळाच्या पृष्ठभागापासून सुमारे ३१६ किलोमीटर अंतरावरून फिरत आहे. आपल्या अत्याधुनिक रडार तंत्रज्ञानाच्या मदतीने हे यान केवळ फोटोच नाही, तर जमिनीच्या आत नेमके काय आहे, याचाही शोध घेत आहे.

नासाने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून ही माहिती शेअर करताना ऑर्बिटरच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. ऑर्बिटरमधील 'हायराईज' कॅमेऱ्याने ही विलोभनीय छायाचित्रे टिपली आहेत.

यातून नासाने मंगळवार नेमके कुठे उतरायचे? बर्फ कुठे आहे? प्राचीन काळी नद्या नेमक्या कुठून वाहत होत्या? याचा भूगर्भीय नकाशा तयार केला आहे.