Mara Crocodiles : ‘ग्रेट मायग्रेशन’मधील निर्दयी शिकारी, जगातील सर्वात आक्रमक मगरी!

Namdev Gharal

आफ्रिकेतील मारा नदीत मिळणाऱ्या मारा क्रॉकोडाईल या जगातील सर्वात आक्रमक व महाकाय मगरी असतात. या ग्रेट मायग्रेशनदरम्यान विल्डबिस्ट, झेब्रा यांची अत्‍यंत निर्दयीपणे शिकार करतात.

मारा नदीतील पूर्ण वाढ झालेली मगर सुमारे १६ ते २० फूट लांब असू शकते आणि तिचे वजन ७०० ते १,००० किलो किंवा त्याहूनही अधिक असू शकते.

दरवर्षी लाखो विल्डरबीस्ट (Wildebeest) आणि झेब्रा सेरेनगेटीतून मसाई माराकडे स्थलांतर करताना मारा नदी पार करतात. या स्थलांतरादरम्यान या मगरी पात्रात दबा धरून बसतात आणि प्राण्यांवर अचानक हल्ला चढवून शिकार करतात.

मगरी नदीच्या त्या भागांमध्ये आधीच गोळा होतात जिथे पाण्याचा प्रवाह संथ असतो किंवा जिथून प्राणी नदीत उडी मारण्याची सर्वाधिक शक्यता असते

मगरी आपले संपूर्ण शरीर पाण्यात बुडवून ठेवतात; फक्त डोळे, नाकपुड्या आणि कानांची छिद्रे पाण्याच्या पृष्ठभागावर असतात. गढूळ पाण्यात त्यांचा रंग खडकासारखा असल्याने ओळखून येत नाहीत

भक्ष्य जवळ येताच मगर आपल्या शक्तिशाली शेपटीचा फटका मारून पाण्याच्या पृष्ठभागावर वेगाने झेप घेते. ती थेट प्राण्याच्या चेहऱ्यावर, नाकावर किंवा पायांवर जबड्याची मजबूत पकड मिळवते.

गुदमरुन मारणे : मगरींचा पाण्याच्या पृष्ठभागाखाली ओढून नेतात. विल्डरबीस्ट किंवा झेब्रा कितीही ताकदवान असले तरी पाण्यात मगरीच्या ताकदीपुढे ते टिकू शकत नाहीत आणि काही मिनिटांत गुदमरून मरतात.

मगरींना चर्वण करता येत नाही (अन्न चावता येत नाही). त्यामुळे त्या भक्ष्याला जबड्यात पकडून पाण्यात स्वतःभोवती वेगाने गोल फिरवतात (ज्याला 'डेथ रोल' म्हणतात). यामुळे भक्ष्याचे तुकडे करणे त्यांना सोपे जाते.

शिकार खूप मोठी असल्यास किंवा एकाच वेळी अनेक शिकार हाती लागल्यास, मगरी त्या पाण्याच्या तळाशी असलेल्या झाडांच्या मुळांमध्ये किंवा खडकांच्या फटीत अडकवून ठेवतात.

यांच्या जबड्यात सुमारे ६४ ते ६८ तीक्ष्ण दात असतात. प्राण्यांच्या विश्वात सर्वाधिक जबड्याची ताकद असणाऱ्या जीवांमध्ये यांचा समावेश होतो; यांच्या चाव्याचा दाब प्रति चौरस इंच सुमारे ५,००० पाउंड्स इतका असू शकतो.

थंड रक्ताचे प्राणी असल्याने यांचा चयापचय दर अत्यंत संथ असतो. स्थलांतराच्या हंगामात भरपूर भक्ष्य खाल्ल्यानंतर त्या अन्नाशिवाय कित्येक महिने सहज जिवंत राहू शकतात.