Namdev Gharal
मॅनॉस (Manaus) हे ब्राझिलमधील एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण शहर असून, सोशल मीडियावरील एका सरळ रेषेत जंगल व शहराची विभागणी होते असे दावे होतात तर या शहराचे भौगोलिक वास्तव काय आहे हे जाणून घेऊ
अमेझॉनच्या मध्यभागी वसलेले शहर: मॅकॉस हे ब्राझिलच्या 'अमेझोनास' राज्याची राजधानी असून ते जगातील सर्वात मोठे वर्षावन असलेल्या अमेझॉन जंगलाच्या अगदी मध्यभागी वसलेले आहे.
जंगलाने वेढलेले बेट : हे शहर पूर्णपणे जंगलाने वेढलेले आहे. येथे पोहोचण्यासाठी रस्ते मार्ग अत्यंत कमी आहेत; त्यामुळे देशाच्या इतर भागांशी जोडण्यासाठी प्रामुख्याने विमान सेवा किंवा नदी मार्गाने जहाजांचा वापर केला जातो.
हे शहर रिओ निग्रो नदी (Rio Negro) आणि अमेझॉन नदी यांच्या संगमावर वसले आहे. या दोन्ही नद्यांचे पाणी वेगवेगळ्या रंगांचे असून ते काही किलोमीटरपर्यंत न मिसळता शेजारी-शेजारी वाहते, जे या शहराचे मोठे आकर्षण आहे.
सोशल मीडियावरील 'सरळ रेषेच्या' फोटोंचे वास्तव: सोशल मीडिया आणि गुगल अर्थवर दिसणाऱ्या ज्या फोटोंमध्ये एका बाजूला दाट जंगल आणि दुसऱ्या बाजूला अगदी सरळ रेषेत कापल्यासारखे शहर दिसते, ते फोटो पूर्णपणे खरे आहेत.
ही सरळ रेषा मानवनिर्मित सीमारेषा किंवा 'बफर झोन' आहे. ब्राझिल सरकारच्या कडक पर्यावरण कायद्यांमुळे आणि राखीव वनक्षेत्राच्या नियमांमुळे शहराचा विस्तार एका निश्चित रेषेच्या पलीकडे करण्यास कायदेशीर बंदी आहे.
या कडक सीमारेषेमुळे शहराची लोकसंख्या वाढली तरी लोकांना जंगलाची झाडे तोडून पुढे वस्ती वाढवता येत नाही. यामुळेच सॅटेलाइट इमेजमध्ये एका बाजूला आधुनिक इमारती आणि दुसऱ्या बाजूला थेट घनदाट जंगल अशी अचूक विभागणी दिसते.
जंगलात वसलेले असले तरी मॅकॉस हे कोणतेही छोटे गाव नसून सुमारे २४ लाख लोकसंख्या असलेले एक आधुनिक औद्योगिक व व्यापारी केंद्र आहे, जिथे आंतरराष्ट्रीय विमानतळ, बंदरे आणि मोठ्या कंपन्यांचे कारखाने आहेत.
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात जगातील रबर उत्पादनाचे हे मुख्य केंद्र होते. या रबर क्रांतीमुळे हे शहर इतके श्रीमंत झाले होते की, वीज व ट्राम सेवा सुरू करणारे हे ब्राझिलमधील सुरुवातीच्या शहरांपैकी एक ठरले.
अमेझॉन जंगलाची सफर, वन्यजीव संशोधन आणि नदीतील नौकाविहारासाठी जगभरातील पर्यटकांना याच शहरात यावे लागते, ज्यामुळे याला 'अमेझॉनचे प्रवेशद्वार' म्हटले जाते.