Lolong Crocodile: गिनीज बुकमध्ये नोंदवलेल्या, १ टन वजनाच्या अवाढव्य मगरीची थरारक कहाणी!

Namdev Gharal

जगात मगर हा डायनासोरच्या काळापासून भितीदायक प्राणी. फिलीपिन्समध्ये तर एक अशी मगर सापडली होती जिची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. ही होती माणसाला गिळणारी मगर

या मगरीचे नाव लोलाँग असे होते. ही एक खाऱ्या पाण्यातील महाकाय मगर होती. सप्टेंबर २०११ मध्ये फिलिपिन्सच्या 'बुनावान' (Bunawan) शहरातील एका खाडीतून तिला पकडण्यात आले होते.

लोलाँगची लांबी २० फूट ३ इंच (६.१७ मीटर) होती आणि तिचे वजन तब्बल १,०७५ किलो होते. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने तिला जगातील सर्वात मोठी पकडलेली मगर म्हणून घोषित केले होते.

'लोलाँग' हे नाव कसे पडले?

या मगरीला पकडण्यासाठी 'अर्नेस्टो लोलाँग कोनाते' नावाचे प्रसिद्ध सरकारी मगर शिकारी आले होते. पण मगरीचा शोध घेत असतानाच त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांच्याच स्मरणार्थ या मगरीचे नाव 'लोलाँग' ठेवण्यात आले.

लोलाँगला पकडणे सोपे नव्हते. तिला पकडण्यासाठी स्थानिक लोक आणि तज्ज्ञांना तब्बल ३ आठवडे लागले. तिला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी जड स्टीलच्या तारांचे जाळे आणि सुमारे १०० लोकांची ताकद लागली होती.

बुनावान गावातील एका स्थानिक मच्छिमाराच्या गायब होण्यामागे आणि एका १२ वर्षांच्या मुलीच्या मृत्यूमागे याच मगरीचा हात असल्याचा संशय होता. तसेच तिने अनेक पाळीव म्हशींनाही फस्त केले होते.

पकडल्यानंतर लोलाँगला बुनावान इको-पार्क आणि संशोधन केंद्रात ठेवण्यात आले होते. तिला पाहण्यासाठी जगभरातून लाखो पर्यटक तिथे येत असत, ज्यामुळे त्या गरीब गावाला कोट्यवधी रुपयांची कमाई झाली.

लोलाँग पिंजऱ्यात फार काळ जगू शकली नाही. पकडल्यानंतर अवघ्या दीड वर्षांनी, १० फेब्रुवारी २०१३ रोजी न्यूमोनिया आणि हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला.

तज्ज्ञांच्या मते, नैसर्गिक अधिवास सुटल्यामुळे आलेला मानसिक ताण आणि पिंजऱ्यातील मर्यादित वातावरण यामुळे तिचा मृत्यू झाला असावा. तिच्या मृत्यूने संपूर्ण बुनावान गाव हळहळले होते.

लोलाँग भलेही आज जिवंत नसली, तरी तिचे शरीर टॅक्सीडर्मी (Taxidermy) तंत्रज्ञानाने जतन करण्यात आले आहे. तिचे अवशेष आणि सांगाडा आज फिलिपिन्सच्या 'नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री' (Manila) मध्ये ठेवले आहेत