पुढारी वृत्तसेवा
कंबरेपासून पोटरीपर्यंत चमक येणे, बसतानाही त्रास होणे किंवा वाकल्यावर तीव्र वेदना होणे हे मणक्यांच्या समस्येचे संकेत असू शकतात.
पाय जळजळणे, सुन्न होणे किंवा सतत दुखणे ही नियंत्रित नसलेल्या मधुमेहाची लक्षणे असू शकतात.
जास्त धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात. थोडे चालले तरी मांड्या आणि पोटऱ्या दुखू लागतात.
बर्याच महिलांना पायात गोळे येतात. दिवसा तशी तक्रार नसते. पण, रात्री झोपेत थोडेसे पाय ताणले गेले की अचानक पोटरीचे स्नायू आखडतात आणि घट्ट होतात. हाताने काही वेळ मसाज केल्यानंतर हळूहळू हे दुखणे कमी होते.
काही वेळा हा प्रकार पावलांच्या बोटातही होतो. एक बोट दुसर्यावर चढते आणि पाऊल सरळ होत नाही. अशा प्रकारचे दुखणे काही वेळा औषधांमुळेसुद्धा उद्भवते.
डाययुरोटिक्स किंवा स्टॅटिन्स यांसारखी औषधे घेणार्या रुग्णांना कधी कधी अशा प्रकारची पायदुखी होते. अशा वेळी औषधांचे प्रमाण कमी करणे किंवा बदलणे हाच उपाय असतो.
नियमित चालणे, गरजेनुसार विश्रांती घेणे, एकाच स्थितीत दीर्घकाळ न राहणे, भरपूर पाणी पिणे आणि कॅल्शियम-जीवनसत्त्वयुक्त पोषक आहार घेणे गरजेचे ठरते.
काही स्त्रियांच्या टाचा खूप दुखतात. शरीराचे सर्व वजन पावलांच्या तुलनेत लहान सांध्यांवर पडते. खाचखळगे, दगड यामुळे पावलांना इजा पोहोचू शकते. यावेळी पादत्राणे नरम, जाड आणि चांगल्या दर्जाची असावीत.
फिरायला जाताना जाड तळामध्ये हवेच्या पोकळ्या असणारे वॉकिंग शूज वापरा. ज्यांची पावले दुखतात त्यांनी एकदा चवड्यावर, एकदा टाचेवर अशा प्रकारचा व्यायाम करावा. वाळूमध्ये चालावे. गवतावर अनवाणी चालावे.
बर्याच जणांची तक्रार असते की, पाय भरून येतात. उभ्याने काम करताना किंवा ऑफिसमध्ये दहा-बारा तास खुर्चीवर बसून काम केल्यास बर्याच स्त्री-पुरुषांचे पाय जड होतात आणि घोट्यांजवळ सूजही दिसते.
गर्भारपणातील अतिरिक्त वजन, पुढे व्यायामाचा अभाव, अनेक तास खुर्चीत बसणे यामुळे पायातील रक्ताभिसरण मंद होते आणि अधिकाधिक रक्त नसांमध्ये साठू लागते.
हा त्रास होऊ नये म्हणून पायांची सतत हालचाल असावी. सोफ्यावर, खुर्चीवर बसताना पाय लोंबकळत ठेवू नयेत. शक्यतो खाली पाय पसरून बसावे, पायाखाली स्टूल घ्यावे किंवा सरळ मांडी घालून बसावे.
दर तासाने इकडे-तिकडे फिरावे. टाचांवर आणि चवड्यांवर चालण्याचा व्यायाम शंभर-दोनशे वेळा करावा.
रात्री झोपताना सुरुवातीची दहा-पंधरा मिनिटे पाय उंच लोडावर ठेवावेत. दिवसासुद्धा भिंतीलगत झोपून दोन्ही पाय भिंतीच्या आधाराने 90 अंशांत उभे करून ठेवल्यास पाच मिनिटांत आराम जाणवतो.