पुढारी वृत्तसेवा
कर्करोग बोलण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्वरयंत्रावर परिणाम करतो आणि योग्य वेळी निदान व उपचार न झाल्यास तो जीवघेणा ठरू शकतो.
या कर्करोगाचे मुख्यतः तीन प्रकार असतात.
स्वरतारांच्या वरील भागाचा कर्करोग (सुप्राग्लॉटिक कॅन्सर)
स्वरतारांचा कर्करोग (ग्लॉटिक कॅन्सर)
स्वरतारांच्या खालील भागाचा कर्करोग
स्वरयंत्राचा कर्करोग होण्याची संभाव्य कारणे
१) धूम्रपान आणि मद्यपान
तंबाखूसेवन आणि मद्यपान यामुळे स्वरयंत्राच्या पेशींमध्ये अनियंत्रित वाढ होऊ शकते, ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो.
२) अपुऱ्या पोषणमूल्यांचा आहार
आहारात जीवनसत्त्वे आणि खनिजे कमी असल्यास शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते आणि कर्करोगाच्या पेशी वाढीस लागतात.
३) प्रदूषण आणि हानिकारक रसायनांचा संपर्क
फॅक्टरीतील धूर, केमिकल्स किंवा प्रक्षित वातावरणात काम करणे हे देखील या कर्करोगाचे कारण ठरू शकते.
४) विशिष्ट विषाणूंचा प्रादुर्भाव
मानवी पॅपिलोमा विषाणू (HPV) आणि इतर काही विषाणू हे कर्करोग वाढण्यास कारणीभूत ठरू शकतात.
स्वरयंत्राच्या कर्करोगाची लक्षणे
या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात स्पष्ट लक्षणे दिसून येत नाहीत; पण पुढील लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.
आवाज बदलणे आणि घोगरा पडणे, घशात किंवा मानेत गाठ येणे, गिळताना त्रास होणे, सतत खोकला येणे आणि घशात अडथळा वाटणे, श्वास घेताना अडचण येणे आणि दम लागणे, घशात जळजळ आणि वेदना होणे.
ही लक्षणे दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकून राहिली, तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.