अंजली राऊत
हिवाळ्याच्या संध्याकाळी चहासोबत काहीतरी गरम खाणे हा खरोखरच एक खास अनुभव असतो. लच्छा पकोडे हलके, कुरकुरीत आणि थरावर थरांनी भरलेले असतात.
मोठे आकाराचे 3 कांदे पातळ काप केलेले, बेसन - 1 कप, कुरकुरीतपणासाठी तांदळाचे पीठ - 2 टेबलस्पून, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कोथींबीर, 1 टीस्पून लाल तिखट, 1/4 टीस्पून हळद, ओवा अर्धा चमचा, मीठ - चवीनुसार, पकोड्याच्या पिठात घालण्यासाठी 1 टीस्पून गरम तेल आणि तळण्यासाठी तेल
कांदा पातळ काप केलेल कांद्याचे थर वेगळे करण्यासाठी हलक्या हाताने मॅश करा. या कांद्यामध्ये मीठ, लाल तिखट, हळद, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घाला आणि चांगले मिसळा. मीठ घातल्यानंतर, कांद्याला पाणी सुटते त्यामुळे जादा पाणी टाकू नका.
त्यानंतर यामध्ये बेसन आणि तांदळाचे पीठ घाला. पाणी लागले तरच घाला, कारण लच्छा पकोड्यांसाठीचे पीठ जास्त जाडसर नसावे. या पीठात कांद्याचे काप चांगले मिसळा, परंतु बेसन जास्त जाडसर नसावे. शेवटी यामध्ये एक चमचा गरम तेल घाला आणि चांगले मिक्स करा. त्यामुळे पकोडे कुरकुरीत होतील
आता एका पॅनमध्ये तेल गरम करा आणि कांद्याचे थोडेसे मिश्रण पॅनमध्ये टाका, कांद्याचे कापाचे तुकडे तसेच राहू द्या. मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. जास्त आचेमुळे लच्छा पकोडे जळू शकतात आणि आत कच्चे राहू शकतात, म्हणून आच मध्यमच ठेवा.
पकोड्याचे जास्त तेल काढून टाकण्यासाठी टिश्यू पेपरवर लच्छा पकोडा काढून ठेवा. आता या गरमागरम लच्छा पकोड्यासाेबत हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा चहासोबत आस्वाद घ्या.