पुढारी वृत्तसेवा
अलिकडेच मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने कुळीथ सूप कसं बनवायचं याची रेसिपी शेअर केली आहे. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत गरमागरम वाफाळलेल्या कुळीथाच सूप कसं बनवायचं.
साहित्य: कुळथाचे पीठ २ मोठे चमचे, लसूण: ७-८ पाकळ्या (सुरुवातीला ठेचण्यासाठी) आणि १० पाकळ्या (वरच्या तडक्यासाठी), मोहरी: १ छोटा चमचा, जिरे: १ चमचा, साजूक तूप: फोडणीसाठी २ मोठे चमचे, उकळताना १ छोटा चमचा आणि तडक्यासाठी २-३ चमचे,
हिंग: १/४ चमचा, हिरवी मिरची: १ बारीक चिरलेली, कढीपत्ता: ८-१० पाने, कांदा: १ छोटा बारीक चिरलेला, काळी मिरी पावडर: १/४ चमचा, आमसूल: २ नग, साखर: १ छोटा चमचा, लिंबू: अर्धा, मीठ: चवीनुसार, पाणी: गरजेनुसार
कृती:
१. पेस्ट तयार करणे: ७-८ लसूण पाकळ्या, १ छोटा चमचा मोहरी आणि १ चमचा जिरे एकत्र करून जाडसर ठेचून घ्या.
२. फोडणी देणे: एका सॉस पॅनमध्ये २ मोठे चमचे साजूक तूप गरम करा. त्यात १/४ चमचा हिंग, ठेचलेले लसूण-मोहरी-जिरे, चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घाला.
३. कांदा परतणे: कांदा हलका लालसर होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्या.
४. पिठाचे मिश्रण: कांदा परतला जाईपर्यंत एका बाऊलमध्ये २ मोठे चमचे कुळथाचे पीठ घ्या. त्यात थोडे पाणी घालून सर्व गुठळ्या मोडून घ्या आणि नंतर भरपूर पाणी घालून पातळ मिश्रण तयार करा.
५. सूप शिजवणे: तयार केलेले कुळथाच्या पिठाचे मिश्रण फोडणीमध्ये ओता. सूप खूप जाडसर ठेवू नका, आवश्यकतेनुसार अजून पाणी घाला.
६. यात १/४ चमचा काळी मिरी पावडर, २ आमसूल, १ छोटा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घाला.
७. वरून अर्ध्या लिंबाचा रस आणि १ छोटा चमचा साजूक तूप टाका. कुळथाच्या पिठाचा कच्चेपणा घालवण्यासाठी झाकण न ठेवता मंद आचेवर साधारण १० मिनिटे हे सूप छान उकळून घ्या.
८. वरचा तडका: एका तडका पॅनमध्ये २-३ चमचे साजूक तूप गरम करा. त्यात १० लसूण पाकळ्या ठेचून टाका आणि त्या लालसर होईपर्यंत तळून घ्या.
९. हा गरमागरम लसूण तडका सूपमध्ये ओता आणि लगेच झाकण लावा जेणेकरून त्याचा खमंग फ्लेवर सूपमध्ये मुरेल.