पुढारी वृत्तसेवा
कोकणात फराळात आवर्जून बनवला जाणारा पदार्थ म्हणजे तांदळाची गोड बोरे. माव्यासारखी खसकेदार आणि चवीला अप्रतिम!
तांदूळ: १ वाटी, गूळ: १/२ वाटी पाणी: १ वाटी तीळ व खोबरे: प्रत्येकी २ चमचे इतर: वेलची पावडर, तेल (तळण्यासाठी)
सर्वात आधी १ वाटी तांदूळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. यामुळे बोरे आतून छान मऊ आणि खसकेदार होतात.
दुसऱ्या दिवशी तांदूळ चाळणीमध्ये काढून घ्या. गॅसवर तांदूळ छान भाजून घ्या, त्याचा रंग बदलेपर्यंत भाजत राहा आणि नंतर ते थंड करून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये त्याची बारीक पावडर करून पीठ तयार करून घ्या.
तयार झालेल्या पिठासाठी एका भांड्यात एक वाटी पाणी, अर्धी वाटी गूळ, दोन चमचे तीळ, दोन चमचे खोबरं, वेलची पावडर आणि अर्धा चमचा तेल घेऊन पाणी उकळून घ्या.
गरम गरम उकळलेले पाणी पीठावर ओतून पीठ एकजीव करून घ्या. पीठ एकजीव केल्यानंतर ते पुन्हा मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्या, ज्यामुळे पीठ हलके होते.
पीठ मळून घ्या आणि त्याची गोल गरगरीत बोरे तयार करून घ्या.
ही बोरे मिडीयम गॅसवर तळून घ्या. तयार झालेली बोरे वरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत असतात.