पुढारी वृत्तसेवा
आश्विन महिन्याची पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमा. हा हिंदू संस्कृतीतील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. या पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हटले जाते.
ही रात्र केवळ चंद्रप्रकाशाच्या सौंदर्यासाठी नाही, तर धार्मिक, आरोग्य आणि आध्यात्मिकदृष्ट्याही विशेष महत्त्वाची मानली जाते.
'कोजागरी' या शब्दाचा अर्थ आहे 'को जागर्ती?' म्हणजे 'कोण जागत आहे?' अशी विचारणा करत देवी लक्ष्मी या रात्री पृथ्वीवर भ्रमण करते, अशी श्रद्धा आहे.
त्यामुळे या रात्री लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी खास पूजा आणि विधी केले जातात. महाराष्ट्रीयन संस्कृतीत या रात्रीला 'लक्ष्मी आगमन' रात्र मानले जाते.
कोजागरी कशी साजरी करावी? खास पद्धत
मसाला दुधाचा खास विधी
प्रसाद तयारी : या रात्री खास सुगंधी मसाला दूध (दूध, साखर, वेलची, जायफळ, केशर आणि ड्रायफ्रूटस्) तयार केले जाते.
चंद्रप्रकाशात ठेवणे : हे दूध एका मोठ्या चांदीच्या किंवा तांब्याच्या भांड्यात भरून रात्रभर चंद्राच्या प्रकाशाखाली (अंगणात किंवा गच्चीवर) ठेवले जाते.
सेवन : मध्यरात्री १२ ते १ च्या दरम्यान, सर्वजण एकत्र जमून हे दूध प्रसाद म्हणून गरम करून पितात. या दुधात चंद्राचे आरोग्यदायी किरण शोषले जातात आणि ते अमृततुल्य बनते, अशी मान्यता आहे.
पारंपरिक जागरण : कुटुंबातील आणि परिसरातील लोक एकत्र जमतात. धार्मिक घरांमध्ये भजन, कीर्तन किंवा देवीची गाणी गायली जातात.
सामाजिक जागरण : अनेक ठिकाणी मित्र-मैत्रिणी, नातेवाईक गच्चीवर किंवा बागेत एकत्र येतात. गाणी, गप्पा, हास्यविनोद आणि खेळ यांच्या माध्यमातून रात्र जागवली जाते.
लक्ष्मी, विष्णूची पूजा : सायंकाळी विष्णू आणि लक्ष्मीची एकत्रित पूजा केली जाते. अनेकजण या दिवशी लक्ष्मीच्या नावाचा उपवास ठेवतात.
पाऊलखुणा : काही पारंपरिक घरांमध्ये तांदळाच्या पिठाचा किंवा गव्हाच्या पिठाचा वापर करून घराच्या दारावर आणि अंगणात लक्ष्मीच्या पाऊलखुणांची रांगोळी (पदचिन्हे) काढली जाते.