भांडी घासताना सावधान! किचन स्पंजमुळे प्लास्टिकचा धोका; जाणून घ्या सोपे उपाय!

पुढारी वृत्तसेवा

भांडी घासण्यासाठी रोज वापरला जाणारा स्पंज आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी धोक्याची घंटा ठरतोय. संशोधनातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जर्मनीतील बॉन विद्यापीठाच्या संशोधकांनुसार, भांडी घासताना आणि स्पंज दाबताना त्यातून प्लास्टिकचे सूक्ष्म कण पाण्यात मिसळतात.

संशोधकांनी प्रत्यक्ष कुटुंबांवर अभ्यास केलाच, शिवाय प्रयोगशाळेत ‘स्पंजबॉट’ नावाचे रोबोटिक उपकरण तयार करून स्पंजवर पडणारा दाब आणि घर्षणाचा अचूक अभ्यास केला.

अंदाजानुसार, एका व्यक्तीकडून वर्षभरात 0.68 ते 4.21 ग्रॅम मायक्रोप्लास्टिक्स पाण्यात सोडले जातात. मोठ्या लोकसंख्येचा विचार केल्यास हा आकडा शेकडो टनांवर जातो.

संशोधनातील सर्वात मोठा खुलासा म्हणजे, भांडी धुताना होणाऱ्या एकूण पर्यावरणीय नुकसानामध्ये मायक्रोप्लास्टिक्सपेक्षा पाण्याचा अपव्यय (85% ते 97%) अधिक कारणीभूत ठरतो.

लायडन विद्यापीठ आणि तज्ज्ञांच्या मते, घाबरून जाण्याची गरज नाही. आपल्या दैनंदिन सवयींमध्ये काही छोटे बदल करून हा धोका सहज टाळता येऊ शकतो.

हे सोपे उपाय नक्की करा

भांडी धुताना नळ चालू ठेवून पाण्याचा अपव्यय टाळा.

बाजारातून कमी प्लास्टिक असलेले किंवा इको-फ्रेंडली स्पंज निवडा.

स्पंज लवकर न बदलता अधिक काळ वापरा.

आपल्या घरातील छोट्या गोष्टीही पर्यावरणावर मोठा परिणाम करतात. आजच आपली सवय बदला!