Kikiriki Chickens : खिशात मावणारी कोंबडी!

Namdev Gharal

हो अगदी ही गोष्ट खरी आहे की जगात एक अशी पूर्ण वाढ झालेली कोंबडी असते की जी सहजपणे खिशात बसू शकते, या कोंबडीला पॉकेट साईज्ड किंवा टॉय चिकनही म्हटले जाते. ही जगातील सगळ्यात लहान कोंबड्यांची जात आहे

यास कोंबडीचे नाव 'किकिरिकी' (Kikiriki Chickens) असे असून ही जगातील सर्वात लहान आणि अतिशय लोकप्रिय अशा फॅन्सी कोंबड्यांच्या जातींपैकी एक आहे.

या कोंबड्यांचे मूळ नाव 'मलेशियन सेरामा' (Malaysian Serama) असे आहे. परंतु, इंडोनेशिया, मलेशिया आणि काही आशियाई देशांमध्ये त्यांच्या आवाजामुळे आणि लहानाशा आकारामुळे त्यांना प्रेमाने 'किकिरिकी' किंवा 'सेरामा' म्हटले जाते.

अतिशय लहान आकार: पूर्ण वाढ झालेल्या किकिरिकी कोंबड्याचे वजन अवघे ३०० ते ५०० ग्रॅम पर्यंतच असते. (आपल्याकडील सामान्य कोंबड्यांचे वजन २ ते ३ किलो असते).

या कोंबड्यांची उभे राहण्याची पद्धत अगदी एखाद्या सैनिकासारखी ऐटबाज असते. त्यांची छाती पुढच्या बाजूला खूप फुगलेली असते आणि मान मागे झुकलेली असते, ज्यामुळे त्या अतिशय देखण्या आणि 'रूबाबदार' दिसतात

यांचे पंख जमिनीला टेकतील इतके खाली झुकलेले असतात, तर शेपटीची पिसे एकदम सरळ वर (९० अंशात) उभारलेली असतात

किकिरिकी कोंबड्या अतिशय शांत, खेळकर आणि माणसाळणाऱ्या स्वभावाच्या असतात. त्यांना सहज हाताळता येते, त्यामुळे लहान मुलेही त्यांच्यासोबत खेळू शकतात

त्यांचा आकार लहान असल्यामुळे आणि त्या जास्त जागा व्यापत नसल्यामुळे, अनेक लोक यांना थेट घरात किंवा बागेत पाळतात

यांचे कोंबडे (Rosters) जे बांग देतात, त्याचा आवाज खूप बारीक आणि ऐकायला गोड असतो, ज्यामुळे शेजाऱ्यांना कोणताही त्रास होत नाही

या कोंबड्यांचा मुख्य उपयोग अंडी किंवा मांसासाठी न करता केवळ 'शोभेचे पाळीव प्राणी' म्हणूनच केला जातो. अनेक देशांमध्ये यांच्या सौंदर्याच्या स्पर्धा देखील भरवल्या जातात

या कोंबड्या आकाराने लहान असल्यामुळे त्यांची अंडीही खूप लहान असतात. या वर्षाला साधारणपणे ५० ते ६० अंडी देतात

या खूप कमी प्रमाणात खाद्य खातात. सामान्य कोंबड्यांचे खाद्य, बारीक केलेले धान्य (बाजरी, गहू) आणि लहान किडे हे यांचे मुख्य अन्न आहे

सध्या भारतात, विशेषतः हौशी पक्षीप्रेमींमध्ये, या किकिरिकी कोंबड्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे