पुढारी वृत्तसेवा
मॉडेल केंडल जेनर हिने बहामासमध्ये सुट्टी घालवताना बीचवेअरवर ‘ओम’चे चिन्ह असलेला 'सारोंग' परिधान केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
तिच्या या पोशाखावर भारतीय नेटकऱ्यांकडून तीव्र टीका होत असून, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे.
काइली जेनरने २४ नोव्हेंबर रोजी इंस्टाग्रामवर बहीण केंडलसोबतचे दोन फोटो शेअर करत "दुनिया की सबसे प्यारी लड़की" असे कॅप्शन दिले होते.
या फोटोंमध्ये केंडलने काळ्या रंगाच्या टू-पीस बिकिनीवर पिवळ्या आणि लाल रंगाचा सारोंग गुंडाळलेला दिसत असून, त्यावर ‘ओम’चे चिन्ह छापलेले आहे.
काइलीने काळ्या रंगाचा फिटेड मिडी ड्रेस परिधान केला आहे. एका फोटोत दोघी एकमेकींना मिठी मारताना, तर दुसऱ्या फोटोत समुद्रासमोर पोज देताना दिसत आहेत.
हे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक भारतीय युजर्सनी ‘ओम’ या पवित्र चिन्हाचा फॅशन किंवा बीच ॲक्सेसरी म्हणून वापर केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
केंडल जेनर ही प्रसिद्ध अमेरिकन मॉडेल आणि रियलिटी टीव्ही स्टार असून, ‘कीपिंग अप विद द कार्दशियन्स’ या लोकप्रिय रियलिटी शोमधून तिला जगभरात ओळख मिळाली.
२००७ ते २०२१ या कालावधीत तिने या शोच्या २० पर्वांमध्ये काम केले आहे.