Kattha : कात- कथ्था, मुखापासून पोटापर्यंत अनेक रोगांसाठी बहुगूणी! पानशिवाय खाणेही फायदेशीर

Namdev Gharal

पाण्याच्या विड्यामधील महत्‍वाचा घटक म्हणजे कात, काताशिवाय पानाला तांबूस रंगच येऊ शकत नाही. पण तो आरोग्यासाठी खूप महत्‍वाचा आहे.

Kattha

कात हा खैर वृक्षाच्या लाकडापासून बनवला जातो. याला आयुर्वेदात 'खदिर' म्हणून ओळखला जातो. कडू, तुरट चवीचा आणि थंड गुणधर्माचा हा पदार्थ आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो.

तोंडाचे आरोग्य आणि दुर्गंधी दूर करणे: कातामध्ये उत्तम अँटीबॅक्टेरियल घटक असतात. दातदुखी, हिरड्यांमधून रक्त येणे (पायोरिया) आणि तोंडाचा वास दूर करण्यासाठी कात गुणकारी ठरतो.

तोंडातील अल्सर व व्रण : तोंड आल्यास किंवा जिभेवर फोड झाल्यास कात लावल्याने किंवा चघळल्याने जळजळ कमी होऊन जखमा लवकर भरून येतात.

घशाचे आजार व खोकला: घशात खवखव, घोगरा आवाज, टॉन्सिल्स किंवा कोरडा खोकला असल्यास काताचा छोटा खडा चघळल्याने घशाला तात्काळ आराम मिळतो.

पचनक्रिया आणि अतिसार : काताचा तुरट (कषाय) गुणधर्म सैल शौचास घट्ट करतो. सौम्य जुलाब, आव पडणे किंवा पोटातील मुरडा थांबवण्यासाठी तो उपयुक्त ठरतो.

कातामध्ये भरपूर प्रमाणात टॅनिन आणि कॅटेचिन (Catechins) असतात, जे पेशींना हानीपासून वाचवतात आणि जखमा लवकर भरण्यास मदत करतात.

कात पानात न घालता अगदी सहज खाता येतो. तंबाखू, चुना किंवा पानाशिवाय सेवन केल्यासच काताचे औषधी गुण पूर्णपणे शरीराला मिळतात:

मधासोबत: घशात खवखव, खोकला किंवा तोंड आले असल्यास चिमूटभर शुद्ध कात पावडर १ चमचा मधात मिसळून चाटण करावे.

कात पावडर पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्यास दातांचे आणि हिरड्यांचे विकार जलद बरे होतात.

एका वेळी साधारण १ ते २ चिमूट इतक्याच मर्यादित प्रमाणात कात वापरावा.याचे अतिसेवन केल्यास बद्धकोष्ठता (Constipation) किंवा पोटात कोरडेपणा येऊ शकतो.