Jyoti Raj monkey man : भारताचा रिअल ‘मंकीमॅन’ : बिना दोरी, बिना सेफ्टी कोणतीही भिंत सरसर चढतो!

Namdev Gharal

कर्नाटक चित्रदुर्ग मध्ये भारताचा एक खरोखराचा मंकी मॅन राहतो, तो स्पायडरमॅनसारखा, किंवा एखाद्या माकडासारखा कोणत्‍याही साधंनाशिवाय कसल्याही भिंतीवर चढतो, या हिरोचे नाव आहे ज्योती राज

कर्नाटकचा ‘मंकी मॅन’ ज्योती राज याचे बालपण अतिशय गरिबीत. त्‍याचा जन्म तामिळनाडू येथे झाला. गरीबीमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना अगदी लहान वयातच कर्नाटकला यावे लागले.

कौटुंबिक परिस्थिती आणि छळामुळे त्यांनी घर सोडले; त्यानंतर जगण्यासाठी त्यांनी बांधकामावर मजुरी आणि इतर कष्टाची कामे केली.

चोरीचा खोटा आळ आणि सततच्या अपमानाला कंटाळून त्यांनी चित्रदुर्ग किल्ल्यावरून उडी मारून जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला होता.

चित्रदुर्ग किल्ला पाहण्यासाठी गेल्यावर तेथील माकडे उंच डोंगराच्या उभ्या कड्यांवर चढताना पाहून त्‍यांनाही वाटले‘मीही असे चढू शकतो का?’ या विचारातून त्यांच्या जगण्याला नवी दिशा मिळाली.

चित्रदुर्ग किल्ला: सरावाची पहिली शाळा त्यांनी माकडांच्या हालचालींचे बारकाईने निरीक्षण केले आणि चित्रदुर्गच्या भव्य, निसरड्या भिंतींवर तासन्‌तास चढण्याचा सराव सुरू केला.

दोरी, हार्नेस किंवा कोणतेही सुरक्षा साधन न वापरता ते केवळ हाता-पायांच्या बळावर उभ्या भिंती आणि खडकांवर चढाई करतात.

‘मंकी किंग’ अशी ओळख : त्यांच्या अद्भूत चपळाईमुळे आणि पाठीवर उलटे लटकण्याच्या कौशल्यामुळे पर्यटक आणि स्थानिक लोक त्यांना ‘मंकी मॅन’ किंवा भारताचा खरा ‘स्पायडरमॅन’ म्हणून ओळखू लागले.

भारतातील प्रसिद्ध आणि निसरड्या अशा ‘जोग फॉल्स’च्या (Jog Falls) महाकाय उभ्या खडकावर यशस्वी चढाई करून त्यांनी देशभरात नाव कमावले.

आपल्या या अद्भूत कौशल्याचा वापर करून त्यांनी चित्रदुर्ग किल्ल्याच्या खोल दऱ्या आणि खडकांमध्ये अडकलेल्या अनेक पर्यटकांचे प्राण सुखरूप वाचवले आहेत.