Weight loss: जपानी लोक वजन कसे कमी करतात? जाणून घ्या ३ मिनिटांची ट्रिक

पुढारी वृत्तसेवा

फिटनेस म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर तासनतास जिममध्ये घाम गाळणे किंवा कठीण डाएट करणे येते.

मात्र, जपानी लोक कोणत्याही व्यायामाशिवाय केवळ चालण्याच्या एका खास पद्धतीमुळे आयुष्यभर फिट आणि स्लिम राहतात.

जपानमध्ये फिट राहणे हा ट्रेंड नसून ती एक जीवनशैली आहे. तिथल्या लोकांच्या आरोग्याचे गुपित एका विशेष तंत्रात दडले आहे, ज्याला 'इंटरव्हल वॉकिंग ट्रेनिंग' असे म्हणतात.

सामान्यपणे आपण एकाच गतीने चालतो, पण 'इंटरव्हल वॉकिंग'मध्ये चालण्याचा वेग बदलला जातो. यात ३ मिनिटे वेगाने चालणे आणि त्यानंतरची ३ मिनिटे संथ गतीने चालणे असा क्रम असतो.

या पद्धतीमुळे साध्या चालण्याच्या तुलनेत २ ते ३ पट अधिक कॅलरीज जळतात आणि वजन वेगाने कमी होते.

हे तंत्र अवलंबणे अतिशय सोपे आहे. यासाठी सकाळी फक्त ३० मिनिटे पुरेशी आहेत.

२-३ मिनिटे वॉर्म-अप करा.

३ मिनिटे पूर्ण ताकदीने चाला. चालताना खांदे मागे आणि पोटाचे स्नायू ताठ ठेवा.

पुढील ३ मिनिटे संथ गतीने चालून शरीराला रिलॅक्स होऊ द्या.

हा पॅटर्न किमान ५ वेळा पुन्हा करा.

संशोधनानुसार, ज्या लोकांनी सलग ५ महिने या तंत्राचा वापर केला, त्यांचे ३ ते ५ किलो वजन सहज कमी झाले.

अनेकांना वाटते की दिवसाला १० हजार पावले चालणे पुरेसे आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते, एकाच गतीने चालल्याने काही वेळानंतर कॅलरीज जळण्याचा वेग मंदावतो.

याउलट, 'इंटरव्हल वॉकिंग'मध्ये हृदयाचे ठोके आणि चयापचय क्रिया सतत सक्रिय राहते. हे तंत्र पोटाचा घेरा कमी करण्यासाठी, ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते.