rent relatives Japan| अजब देश! जिथे चक्क 'भाड्याने' मिळतात नातेवाईक!

पुढारी वृत्तसेवा

शिस्‍त आणि स्‍वच्‍छता यासाठी जगभरात जपान हा देश जगात प्रसिद्ध आहेच; पण तिथे एक असा उद्योग चालतो, जो जगाला थक्क करणारा आहे.

जपानमध्ये चक्क भाड्याने कुटुंब, मित्र किंवा सहकारी मिळतात. गरजेनुसार लोक इथे कोणालाही नातेवाईक म्‍हणून भाड्याने घेवू शकतात.

विशेष म्हणजे समोरच्या व्यक्तीला तो एक भाड्याचा कलाकार आहे, याचा संशयही येत नाही. अशा भाड्याच्‍या नातेवाईक घेण्‍यामागे सामाजिक दबाव आणि लोकांच्या भावनिक गरजा हे मुख्य कारण आहे.

जपानी समाजात आपली सामाजिक प्रतिमा आणि कौटुंबिक स्थिती 'सर्वकाही ठीक आहे' अशी दाखवण्यावर खूप भर दिला जातो. वास्‍तवात नाती बिघडली असतील तर लोक अशा 'सरोगेट' (बदली) नात्यांची मदत घेतात.

जपानमध्ये अशा सेवा देणाऱ्या अनेक कंपन्या कार्यरत आहेत. 'फॅमिली रोमान्स' ही त्यातील सर्वात प्रसिद्ध कंपनी. या कंपनीद्वारे लोक काही तासांपासून ते अनेक वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी नातेवाईक भाड्याने घेऊ शकतात.

लग्नात जोडीदार म्हणून मिरवण्यासाठी, ऑफिस पार्ट्यांमध्ये मित्र किंवा सहकाऱ्यांची भूमिका करण्यासाठी आणि शाळेतील कार्यक्रमांत पालक म्हणून जाण्यासाठी इथे प्रोफेशनल कलाकार सहज उपलब्ध होतात.

जपानमध्ये घटस्फोट किंवा एकटेपणा आजही नकारात्मक मानला जातो. शेजाऱ्यांच्या आणि समाजाच्या नजरेत आपले कुटुंब 'परिपूर्ण' दिसावे, यासाठी हा खटाटोप केला जातो.

एकाकी आयुष्याशी झुंजणारे लोक काही काळासाठी का होईना, कोणाची तरी प्रेमळ साथ अनुभवायला मिळावी म्हणून या सेवेचा आधार घेतात.

'फॅमिली रोमान्स'चे संस्थापक इसेई युची यांनी स्वतः एका मुलीसाठी ८ वर्षे वडिलांची भूमिका निभावली होती. आई आणि मुलीला भावनिक आधार आणि स्थिरता देणे, हाच यामागचा युची यांचा प्रामाणिक उद्देश होता.

जपानमधील हा व्यवसाय समाजाचा एक असा चेहरा समोर आणतो, जिथे एकटेपणा आणि सामाजिक दबावामुळे लोकांना असामान्य पर्याय निवडावे लागतात.

येथे क्‍लिक करा.