पुढारी डिजिटल टीम
ही कहाणी आहे ब्रिटिश काळात सुरू झालेल्या भारतीय बँकिंग इतिहासाची. सुरुवात झाली होती कोलकात्यात...
भारतामध्ये बँकिंगची पायाभरणी 18व्या शतकाच्या शेवटी झाली. तेव्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी देशातील आर्थिक व्यवहारांना व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत होती. त्या काळात वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी बँकांची स्थापना करण्यात आली.
भारताची पहिली बँक म्हणजे बँक ऑफ हिंदुस्तान (Bank of Hindustan)! स्थापना वर्ष होतं 1770 आणि ठिकाण होतं कोलकाता (त्यावेळचे कलकत्ता) ही बँक देशातील पहिली संघटित बँक होती.
या बँकेची स्थापना ब्रिटिश एजन्सी हाउस — अलेक्झांडर अँड कंपनी (Alexander & Co.) यांनी केली होती. उद्देश होता, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या आर्थिक व्यवहारांची सोय करणे.
या बँकेने भारतात आधुनिक बँकिंगची सुरुवात केली. परंतु काही दशकांतच देशात वित्तीय अस्थिरता वाढू लागली. 1829 ते 1832 दरम्यान मोठं आर्थिक संकट आलं, आणि ही बँक दिवाळखोर झाली.
1832 मध्ये बँक ऑफ हिंदुस्तान कायमची बंद झाली. ती भारताच्या बँकिंग इतिहासातील पहिली पण अल्पकाळ टिकलेली बँक ठरली. तिच्या अनुभवातून पुढील बँकांना मार्गदर्शन मिळालं.
बँक ऑफ हिंदुस्ताननंतर जनरल बँक ऑफ इंडिया (1786) स्थापन झाली. मात्र ही बँकही 1791 मध्ये बंद झाली. यानंतर ब्रिटिशांनी आणखी काही बँका स्थापन केल्या, ज्यांनी भारतीय बँकिंगला आकार दिला.
ब्रिटिश काळात स्थापन झाल्या, बँक ऑफ बंगाल (1806), बँक ऑफ बॉम्बे (1840), बँक ऑफ मद्रास (1843). 1921 मध्ये या तीन बँकांचे विलीनीकरण होऊन इंपीरियल बँक ऑफ इंडिया स्थापन झाली.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर इंपीरियल बँक ऑफ इंडियाचे नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ठेवण्यात आले. आज SBI ही भारतातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह बँकिंग संस्थांपैकी एक आहे.