पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्राचा राज्यप्राणी ‘शेकरू’
शेकरू म्हणजेच इंडियन जायंट स्क्विरल हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. सामान्य खारीपेक्षा आकाराने मोठा असलेला हा प्राणी आपल्या आकर्षक रंगांमुळे ओळखला जातो.
तब्बल ३ फूट लांब असते शेकरू!
शेकरूची नाकापासून झुपकेदार शेपटीपर्यंतची लांबी सुमारे २.५ ते ३ फूट असते. त्याचे वजन साधारण २ ते २.५ किलोपर्यंत असू शकते.
अंगावर रंगांची आकर्षक उधळण!
शेकरूच्या अंगावर गडद मरून, तांबूस तपकिरी अशा रंगांच्या छटा असतात. तर पोटाकडील भाग फिकट पिवळा किंवा पांढरट असतो.
उंच झाडांवर बांधते घुमटाकार घरटे!
शेकरू झाडांच्या उंच फांद्यांवर काटक्या, डहाळ्या आणि पानांचा वापर करून घुमटाकार घरटी बांधते. विशेष म्हणजे एक शेकरू एकापेक्षा जास्त घरटी तयार करू शकते.
या झाडांवर असते शेकरूचे घर!
शेकरू प्रामुख्याने करप, आंबा, जांभूळ आणि हिरडा यांसारख्या उंच झाडांवर घरटी बांधते. दाट जंगलातील मोठी आणि जुनी झाडे त्याच्या अधिवासासाठी महत्त्वाची असतात.
एका उडीत पार करते २० फुटांचे अंतर!
शेकरू आपले बहुतांश आयुष्य झाडांवरच घालवते. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर १५ ते २० फुटांपर्यंत उडी मारू शकते. उडी मारताना लांब शेपटीच्या मदतीने तोल सांभाळते.
काय खाते शेकरू?
झाडांची फळे, बिया, फुले, फुलांमधील मध आणि नारळ हे शेकरूचे प्रमुख खाद्य आहे. जंगलातील विविध फळे आणि बिया खाऊन ते आपली भूक भागवते.
वृक्षतोडीमुळे शेकरूचे अस्तित्व धोक्यात?
भीमाशंकर-कर्जत परिसरातील सायडोंगर येथे प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पामुळे वृक्षतोड होण्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. त्यामुळे #SaveBhimashankar मोहिमेतून जंगल वाचवण्याचे आवाहन केले जात आहे.