रणजित गायकवाड
अँडरसन-तेंडुलकर चषकासाठी खेळवण्यात आलेली भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका 2-2 अशा बरोबरीत समाप्त झाली.
ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या अखेरच्या सामन्यात इंग्लंडला ६ धावांनी पराभव पत्करावा लागला आणि या विजयासह भारतीय संघाने मालिका गमावण्यापासून वाचवली.
या मालिकेची सुरुवात भारताने लीड्स येथील पराभवाने केली होती, परंतु त्यानंतर एजबॅस्टन येथील दुसरा कसोटी सामना जिंकला.
लॉर्ड्सवर भारताला पराभवाला सामोरे जावे लागले, तर मँचेस्टर येथील सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे इंग्लंडकडे २-१ अशी आघाडी होती.
ओव्हल कसोटीतही इंग्रज बाजी मारतील असे वाटत होते, पण अखेरच्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी दिलेली झुंज यशस्वी ठरली. यासह यजमानांच्या हातून विजय हिसकावून घेतला.
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली काही खेळाडू वगळता संघात बहुतेक तरुण खेळाडूंना संधी देण्यात आली होती आणि या खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावितही केले.
त्याचबरोबर, अनुभवी खेळाडूंनीही आपले योगदान दिले. त्यातील 5 खेळाडूंचे योगदान मोलाचे ठरले.
जडेजाने पाचही कसोटी सामने खेळले. यादरम्यान, त्याला गोलंदाजीत विशेष चमक दाखवता आली नाही, पण फलंदाजीत जबरदस्त कामगिरी केली.
पाच सामन्यांमध्ये त्याने 86 च्या सरासरीने 516 धावा केल्या. यामध्ये एका शतकाचा आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. तर गोलंदाजीत त्यांनी 7 बळी मिळवले.
या दौऱ्यावर भारतीय संघाचा युवा सलामीवीर जैस्वाल सातत्याने धावा करू शकला नाही, तरीही त्याने काही महत्त्वपूर्ण खेळ्या साकारल्या, ज्यांचा संघावर मोठा प्रभाव पडला.
जैस्वालने 41.10 च्या सरासरीने 410 धावा केल्या. यात 2 शतके आणि 2 अर्धशतकांचा समावेश होता.
इंग्लंडविरुद्धच्या सध्याच्या कसोटी मालिकेत कर्णधार शुभमन गिलने आघाडीवर राहून संघाचे नेतृत्व केले. तो मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
गिलने 10 डावांमध्ये 75.40 च्या सरासरीने 754 धावा केल्या आणि 4 शतके झळकावली.
एजबॅस्टन कसोटीत तर त्याने आपल्या शतकाचे द्विशतकात रूपांतर केले. या शानदार कामगिरीसाठी त्याला ‘मालिकावीर’ म्हणूनही गौरवण्यात आले.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघासाठी मोहम्मद सिराजची कामगिरी अत्यंत लक्षवेधी ठरली. सिराजने सर्व सामने खेळले आणि प्रत्येक सामन्यात पूर्ण ताकदीनिशी गोलंदाजी केली.
बुमराहच्या अनुपस्थितीत त्याची कामगिरी अधिकच बहरली आणि त्याने गोलंदाजीच्या आक्रमणाचे उत्तम नेतृत्व केले.
सिराजने 32.43 च्या सरासरीने 23 बळी घेतले आणि तो मालिकेत सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. यादरम्यान त्याने दोनदा एका डावात 5 बळी घेण्याची किमयाही केली.
रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर, इंग्लंडमध्ये सलामीची जबाबदारी यशस्वी जैस्वालसोबत अनुभवी केएल राहुलवर सोपवण्यात आली होती. राहुलने अजिबात निराशा केली नाही आणि अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केली.
त्याने बहुतेक सामन्यांमध्ये नव्या चेंडूचा समर्थपणे सामना केला आणि इतर फलंदाजांसाठी परिस्थिती सोपी केली. त्याच वेळी, स्वतः खेळपट्टीवर स्थिरावल्यावर त्याने धावादेखील जमवल्या. या मालिकेत राहुलने 53.20 च्या सरासरीने 532 धावा केल्या, ज्यात 2 शतके आणि 2 अर्धशतकांचा समावेश होता.