पुढारी वृत्तसेवा
दिवसभर डेस्क जॉब करणार्या लोकांसाठी एक आरोग्यविषयक महत्त्वाचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.
रक्तवाहिन्यांचे सर्जन तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही दिवसातील 9 तास खुर्चीवर बसून असाल, तर सायंकाळी 10,000 पावले चालूनही तुमच्या रक्तवाहिन्यांचे (व्हेन्स) झालेले नुकसान भरून काढता येत नाही.
रक्ताभिसरण (ब्लड सर्क्युलेशन) हे तुम्ही एकूण किती पावले चालता यावर अवलंबून नसून, तुम्ही किती वारंवार हालचाल करता, यावर अवलंबून असते.
गुरुत्वाकर्षणामुळे (ग्रॅव्हिटी) रक्तहृदयाकडे परत ढकलण्यासाठी पायांच्या रक्तवाहिन्यांना खूप मेहनत घ्यावी लागते. पायातील पिंडरीचे स्नायू (क्लार्फ मसल्स), ज्यांना शरीराचे दुसरे हृदय देखील म्हणतात, ते आकुंचन पावून रक्तवरच्या दिशेने ढकलतात.
जेव्हा एखादी व्यक्ती जास्त वेळ न हलता बसून राहते, तेव्हा रक्त साचून राहते. पिंडरीचे स्नायू निष्क्रिय राहिल्याने पायांमध्ये रक्तप्रवाह मंदावतो आणि रक्त साचू लागते. पायातील शिरांमध्ये दबाव वाढतो. वाढलेल्या दाबामुळे रक्तवाहिन्यांच्या आतील झडपा कमकुवत होतात.
परिणामी सूज येणे, जडपणा जाणवणे, व्हेरिकोज व्हेन्स तयार होणे आणि कालांतराने रक्ताच्या गाठी (ब्लड क्लॉटस) होण्याचा धोका वाढतो.
तज्ज्ञांच्या मते, तुम्ही संध्याकाळी जरी जास्त चाललात, तरी दिवसभर न हलता बसून राहिल्यामुळे झालेल्या रक्ताच्या या स्थिरतेला (इमोबॅलिटी) तुम्ही पूर्ववत करू शकत नाही.
रक्तवाहिन्यांचे आरोग्य जपण्यासाठी जास्त चालण्यापेक्षा वारंवार आणि नियमित हालचाल सातत्याने करणे महत्त्वाचे आहे
प्रत्येक 45 ते 60 मिनिटांनी उठा. थोडे ताणून (स्टे्रच) घ्या किंवा कमीत कमी दोन मिनिटे चाला. पिंडरीच्या स्नायूंना सक्रिय करा, खुर्चीवर बसल्या बसल्या देखील घोट्याचे स्नायू फिरवा किंवा टाचांवर उभे राहण्याचा व्यायाम करा.